Pakistan first Test defeat against Bangladesh : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला बांगलादेशकडून १० विकेट्सनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी केवळ ३० धावांचे लक्ष्य दिले होते. ज्याचा पाठलाग करताना बांगलादेशने ६.३ षटकात एकही विकेट न गमावता विजयावर शिक्कामोर्तब केला. ज्यामुळे पाकिस्तानला प्रथमच बांगादेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही फटका बसला.

कसा झाला सामना?

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने ६ बाद ४४८ धावांवर डाव घोषित केला. यादरम्यान पाकिस्तानकडून सौद शकीलने १४१ आणि मोहम्मद रिझवानने १७१ धावा केल्या. यानंतर बांगलादेश संघ प्रत्युत्तरात ५६५ धावांवर गारद झाला. यासह बांगलादेशने पहिल्या डावात ११७ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला १४६ धावांवर गुंडाळले. ज्यामुळे बांगलादेशला केवळ विजयासाठी ३० धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याचा पाठलाग बांगलादेशने ६.३ षटकात एकही विकेट न गमावता केला.

बांगलादेशला विजयाचा झाला फायदा –

या विजयासह बांगलादेशचा संघ डब्ल्यूटीसी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी ४० वर पोहोचली आहे. त्याचबरोबर बांगलादेशच्या खात्यात आता २४ गुण आहेत. यापूर्वी संघ आठव्या स्थानावर होता. त्याचवेळी या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे नुकसान झाले आहे. संघाची सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याच्या खात्यात २२ गुण आहेत आणि विजयाची टक्केवारी ३०.५६ आहे.

हेही वाचा – Shikhar Dhawan : ‘आशा आहे की त्याला कळेल…’, निवृत्तीनंतर शिखर धवनचा मुलगा झोरावरसाठी भावनिक संदेश

इंग्लंड चौथ्या स्थानावर पोहोचला –

दुसरीकडे, इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या चक्रातील १४ कसोटी सामन्यांमधील इंग्लंडचा हा सातवा विजय आहे. यासह त्याचे गुण ६९ झाले असून विजयाची टक्केवारी ४१.०७ झाली आहे. इंग्लंडचा संघ आता चौथ्या स्थानावर पोहोचला असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी दावा केला आहे. यापूर्वी संघ सहाव्या स्थानावर होता.

हेही वाचा – Rohit Sharma Shikhar Dhawan: “तू नेहमीच माझ्यासाठी…” रोहित शर्माची ‘अल्टीमेट जाट’साठी खास पोस्ट, धवनबरोबरचे जुने फोटो केले शेअर

भारत अव्वल स्थानावर कायम –

भारत आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया अनुक्रमे ६८.५ आणि ६२.५ गुणांसह अव्वल दोनमध्ये कायम आहेत. भारतीय संघाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईत होणार आहे. तर, दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठेच्या पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाईल.

Story img Loader