Champions Trophy Pakistan Final: नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियानं विजेतेपदावर नाव कोरलं आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांची १२ वर्षांची प्रतीक्षा संपली. मात्र यंदा टीम इंडियाच्या विजयी कामगिरीसोबतच पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीचीही जोरदार चर्चा चालू आहे. स्वत: यजमान देश असूनही पाकिस्तानच्या संघाला साखळी फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. त्यामुळे संघाच्या नामुष्कीजनक कामगिरीवर पाकिस्तानी क्रिकेट चाहते प्रचंड नाराज असतानाच पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल यानं जाहीरपणे संघावर टीका केली आहे.
अंतिम सामन्यानंतर स्टेजवरून पाकिस्तान गायब!
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाली तेव्हा पाकिस्तानमधील मैदानांवर स्पर्धेत खेळणाऱ्या इतर देशांचे ध्वज स्टेडियममध्ये लावलेले असताना भारताचा ध्वज मात्र तिथे लावण्यात आला नव्हता. त्यावरून बरीच चर्चा झाल्याचं दिसून आलं. मात्र, आता स्वत: यजमान असूनदेखील खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एकही पदाधिकारी चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात व्यासपीठावर नव्हता. त्यामुळे आयसीसीनं यजमान पाकिस्तानलाच या कार्यक्रमातून हद्दपार केल्याची चर्चा रंगली आहे. त्यावरून आता कामरान अकमलनं भूमिका स्पष्ट केली आहे.
ICC नं आम्हाला आरसा दाखवला – कामरान अकमल
व्यासपीठावर पाकिस्तानला जागा न देऊन आयसीसीनं आम्हाला आरसा दाखवला, असं कामरान अकमल म्हणाला आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कामरान अकमलनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाकिस्तानच्या कामगिरीवर भाष्य केलं
“या स्पर्धेचे पाकिस्तानमधील संचालक सुमेर हे अंतिम सामन्यासाठी उपस्थित होते. ते व्यासपीठावर येण्यासाठी उपलब्धही होते. पण तरीदेखील बक्षिस वितरण समारंभात त्यांना सहभागी करून घेतलं गेलं नाही. का? कारण आम्ही त्या व्यासपीठावर असण्यासाठी पात्रच नाही आहोत. आम्ही चांगलं क्रिकेट खेळतच नाही आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला आरसा दाखवला आहे”, असं अकमल म्हणाला.
“ही स्पर्धा संपल्यानंतर कुणीही पाकिस्ताननं कशा प्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन केलं यावर बोलत नाहीये. जर आम्ही असं क्रिकेट खेळणार असू, तर आम्हाला अशीच वागणूक मिळणार. जर तुम्ही स्वत:साठी खेळणार असाल, तर तुम्हाला आदर मिळणार नाही”, असंही अकमलनं नमूद केलं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केली तक्रार
दरम्यान, अंतिम सामन्यानंतरच्या कार्यक्रमात पाकिस्तानला यजमान असूनही व्यासपीठावर प्रतिनिधित्व देण्यात आलं नाही, याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे केली आहे. सुमेर अहमद हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्पर्धेचे संचालक होते. मात्र, त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आलं नव्हतं.
या आक्षेपावर ICC कडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी पीटीआयनं दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने फायनान्शियल एक्स्प्रेसनं आयसीसीच्या उच्चपदस्थांची भूमिका वृत्तामध्ये दिली आहे. “जर PCB नं नीट पाहिलं, तर आयसीसीचे सीईओ जॉफ अॅलेरडाईस हेही व्यासपीठावर नव्हते. याचं कारण यासंदर्भातले ठराविक शिष्टाचार हे होतं”, असं या उच्चपदस्थाने सांगितलं आहे. शिवाय, याआधी इतर स्पर्धांमध्येही स्पर्धेचे संचालक व्यासपीठावर नव्हते, असंही त्यांनी नमूद केलं.