ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांमधील वीस वर्षांची पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी पाकिस्तान उत्सुक झाला आहे. या दोन संघांमध्ये येथे बुधवारी पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू होत आहे. मात्र या सामन्यात त्यांना फिरकी गोलंदाज सईद अजमल याच्या अनुपस्थितीत खेळावे लागणार आहे.
गोलंदाजीच्या संशयास्पद शैलीमुळे अजमल याला संघातून बडतर्फ करण्यात आले आहे. येथील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. अजमल याने येथील खेळपट्टीवर आजपर्यंत सहा कसोटींमध्ये ३७ बळी घेतले आहेत. या सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळाला होता. २०१२ मध्ये पाकिस्तानने इंग्लंडला ३-० अशी धूळ चारली होती. या तीन सामन्यांमध्ये अजमल याने २४ बळी घेतले होते.
पाकिस्तानच्या गोलंदाजीची मुख्य मदार उदयोन्मुख गोलंदाज यासीर शाह व झुल्फिकार बाबर यांच्यावर आहे. कर्णधार मिसबाह उल हक याला स्वत:च्या फलंदाजीतील अपयशाची चिंता लागली आहे. मात्र येथे तो चांगली कामगिरी करण्यासाठी आशावादी आहे. तो म्हणाला, अजमलच्या अनुपस्थितीत आमच्यापुढे गोलंदाजीबाबत समस्या निर्माण झाल्या आहेत. तथापि मला युवा गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरीची खात्री वाटत आहे.
युनुस खान व अजहर अली या अनुभवी फलंदाजांच्या पुनरागमनामुळे पाकिस्तानच्या फलंदाजीची बाजू भक्कम झाली आहे. पाकिस्तानने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९४ मध्ये विजय मिळविला होता.
ऑस्ट्रेलियास नाथन लियान व स्टीव्ह ओकेफी या फिरकी गोलंदाजांकडून चांगल्या यशाची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध गेल्या चौदा कसोटींपैकी १३ सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे.

Story img Loader