Pakistan Fan Angry After Defeat: रविवारचा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खऱ्या अर्थानं सुपरसंडे ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवल्यानंतर रविवारी टीम इंडियानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी करत भारतानं ४१ षटकांतच विजयासाठीचं आव्हान पार केलं. पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर सोशल मीडियावर एकीकडे तुफान मीम्स व्हायरल होत असताना दुसरीकडे पाकिस्तानी चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रियाही व्हायरल होत आहेत. काही चाहत्यांनी तर सामना चालू असतानाच स्टेडियममध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.
“किमान लढत तरी द्या, काहीच केलं नाही”
पाकिस्तानच्या पराभवानंतर दुबईत सामना पाहायला आलेल्या पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. एका चाहत्यानं कॅमेऱ्यासमोर बोलताना पाकिस्तान संघाकडून किमान लढत देण्याची अपेक्षा व्यक्त केली. “मी ४ हजार रुपयांचं तिकीट खरेदी केलं होतं. तिकीट मिळवण्यासाठी ३-४ दिवस लागले आम्हाला. खूप खर्च केला आहे, काय समजणार तुम्हाला. काय काय नाही केलं आम्ही. या खेळाडूंनी काहीतरी करायला हवं होतं. किमान भारताला चांगली लढत द्यायला हवी होती. लढतच देऊ शकले नाहीत. आम्हाला फार वाईट वाटलं”, असं हा चाहता म्हणताना व्हिडीओत दिसत आहे.
मैदानातच शाहीन आफ्रिदीला ऐकवलं!
दरम्यान, एका चाहत्यानं तर सामना पाकिस्तान गमावत असल्याचं दिसताच मैदानातच ऐकवायला सुरुवात केली. शाहीन आफ्रिदी सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असताना “शाहीन भाई, अजून किती लाज आणणार आहात? आमची काय चूक आहे? आम्हालाही सांगा. आम्ही काय वाईट केलं तुमचं? सांगा तरी आम्हाला”, असा जाब या चाहत्यानं विचारला.
“किमान विराट कोहलीचं शतक…”
दरम्यान, एका पाकिस्तानी युवतीनं संघ ३५० धावांपर्यंत जाईल असं वाटलं होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला खूप आशा होत्या की आमची टीम जिंकेल. मला तर वाटलं होतं की आमची टीम किमान ३५० धावांपर्यंत मजल मारेल. पण आमच्या टीमला २५० पर्यंतही जाता आलं नाही. आमच्या टीमचा पराभव झाला तरी किमान त्यांनी कोहलीची सेंच्युरी होऊ द्यायला नको होती. बॅटिंग चांगली करता आली नाही तर किमान बॉलिंग तरी चांगली करायला हवी होती. चांगल्या बॉलिंगच्या मदतीने सामना वाचवता आला असता. माझी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विनंती आहे की जुन्या लोकांना बाजूला सारा आणि नवे चेहरे घेऊन या जेणेकरून आपल्या खेळात सुधारणा होईल”, असा सल्ला या युवतीनं PCB ला दिला आहे.
वासिम अक्रमचा किस्सा!
दरम्यान, पाकिस्तानच्या कामगिरीचं विश्लेषम करताना माजी जलदगती गोलंदाज वासिम अक्रमनं खोचक टिप्पणी केली आहे.
“एक व्यक्ती ज्योतिषाकडे जाऊन विचारतो की माझं भविष्य काय आहे? ज्योतिष सांगतो तू गरीब होशील. मग आणखी गरीब होशील. मग खूप गरीब होशील. त्यानंतर ही व्यक्ती विचारते, मग काय होईल? तेव्हा ज्योतिष त्याला सांगतो तुला गरिबीची सवय होईल. तीच अवस्था आमची झाली आहे. आम्हाला पराभवाची सवय झाली आहे”, अशी टिप्पणी वासिम अक्रम यांनी एका टीव्ही शोदरम्यान केली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.