World Test Championship Points Table Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्याच्या पाचव्या दिवशी एकही खेळ होऊ शकला नाही. अशा स्थितीत अंपायर्सनी पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करून सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या जवळ होता. वेस्ट इंडिजला ३६५ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरादाखल त्यांनी दोन गडी बाद ७६ धावा केल्या होत्या आणि शेवटच्या दिवशी विंडीजला २८९ धावा करायच्या होत्या. त्याचवेळी भारताला विजयासाठी आठ विकेट्सची गरज होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाचव्या दिवशी ९८ षटकांचा खेळ व्हायचा होता. मात्र, पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. भारताने पहिली कसोटी एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली होती. अशाप्रकारे टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका १-०ने अशी खिशात घातली. ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ नवीन चक्रात खूप नुकसान सहन करावे लागले आहे. सध्याच्या गुणतालिकेत पाकिस्तानने भारताला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे.

WTC गुणतालिकेची सध्याची स्थिती

खरेतर, २०२१-२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आवृतीचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरल्यानंतर, भारतीय संघाने २०२३-२५ च्या चक्राची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेने केली. WTC मध्ये एक कसोटी सामना जिंकणाऱ्या संघाला १२ गुण दिले जातात. त्याच वेळी, टायसाठी सहा गुण आणि ड्रॉसाठी चार गुण दिले जातात. भारताने पहिली कसोटी जिंकून १२ गुण मिळवले होते. तसेच, गुणांची टक्केवारी 100 होती. अशा परिस्थितीत टीम इंडिया डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली होती. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघही श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून तेथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी जिंकली आणि भारताच्या अगदी खाली दुसऱ्या स्थानावर पोहोचले.

सामना अनिर्णीत राहिल्यामुळे भारताचे नुकसान

टीम इंडियाने जर दुसरी कसोटी जिंकली असती, तर त्याला आणखी १२ गुण मिळाले असते आणि एकूण २४ गुण आणि १०० गुणांच्या टक्केवारीसह ते अव्वल स्थानावर राहिले असते. मात्र, सामना अनिर्णीत राहिल्यामुळे भारताला वेस्ट इंडिजबरोबर प्रत्येकी चार गुण शेअर करावे लागले. अशा परिस्थितीत, दोन कसोटीनंतर टीम इंडियाचा एक विजय आणि एक पराभवासह १६ गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी ६६.६७ वर आली आहे.

दुसरीकडे, त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याच्या निकालानंतरच गुणतालिकेत आणखी काही बदल होणार आहेत. टीम इंडिया एका स्थानाने घसरून दुसऱ्या स्थानावर आली आहे आणि पाकिस्तान एका विजयामुळे १०० गुणांच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. गुणांच्या तक्त्यामध्ये गुणांच्या टक्केवारीला अधिक महत्त्व दिले जाते. अशा प्रकारे संघ WTC फायनलसाठी पात्र ठरतात.

हेही वाचा: IND vs WI 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊस ठरला व्हिलन! टीम इंडियाने १-०ने मालिका घातली खिशात

अ‍ॅशेसमध्येही गुणांसाठी जोरदार लढत सुरु आहे

ऑस्ट्रेलिया २६ गुण आणि ५४.१७ पॉइंट टक्केवारीसह तिसर्‍या आणि इंग्लंड १४ गुण आणि २९.१७ पॉइंट टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांनी WTCच्या २०२३-२५ ​​चक्रात प्रत्येकी चार कसोटी सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने यापैकी दोन कसोटी जिंकल्या आहेत, एक गमावली आहे, तर एक कसोटी अनिर्णित राहिली आहे. दुसरीकडे इंग्लंडने एक सामना जिंकला आहे, दोन गमावले आहेत आणि एक कसोटी अनिर्णित राहिली आहे.

वेस्ट इंडिजचे दोन कसोटी सामन्यांतून एक पराभव आणि एक अनिर्णित आणि १६.६७ गुण टक्केवारीसह चार गुण आहेत. एका कसोटीत एका पराभवासह श्रीलंकेचे एकही गुण नाहीत. गुणांची टक्केवारी काढण्याची पद्धत अशी आहे की, कसोटी जिंकल्यानंतर, संघाने मिळवलेल्या एकूण गुणांची संख्या, खेळलेल्या एकूण गुणांच्या संख्येने भागली पाहिजे. म्हणजेच भारताचे सध्याचे गुण १६ आहेत आणि जर संघाने दोन्ही सामने जिंकले असते तर त्यांना एकूण २४ गुण मिळाले असते, तर १६ ला २४ ने भागले पाहिजे.

हेही वाचा: IND vs WI: वेस्टइंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित; WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठे फेरबदल, टीम इंडिया ‘या’ क्रमांकावर

न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका यांच्यात अद्याप एकही कसोटी खेळलेली नाही

आतापर्यंत फक्त भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांनी २०२३-२५ ​​आवृतीच्या चक्रात खेळायला सुरूवात केली आहे. या चक्रात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत एकही कसोटी खेळलेली नाही. न्यूझीलंड विश्वचषकानंतर बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने त्यांच्या WTC चक्राची सुरुवात करेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचे नवे चक्र डिसेंबरमध्ये भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने सुरू होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan happy as india west indies 2nd test match is a draw what is the equation in wtc points table find out avw