PAK vs SA ODI Highlights in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तिरंगी मालिकेत पाकिस्तानने मोठा विजय नोंदवला आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. मोहम्मद रिझवान आणि सलमान आगा यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ३५३ धावांचं लक्ष्य यशस्वीरित्या गाठलं आणि शानदार विजय आपल्या नावे केला.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३५३ धावांच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना त्यांना ६ विकेट्सने पराभूत केले. यासह पाकिस्तान संघ तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. या मोठ्या विजयात पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सलमान आगा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात दोघांनी जबरदस्त शतकं झळकावली आणि २६० धावांची भागीदारी केली.

प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने पाकिस्तानला ३५३ धावांचे लक्ष्य दिले, याच्या प्रत्युत्तरात मोहम्मद रिझवान आणि सलमान अली आगा यांच्या खेळीमुळे पाकिस्तानने मोठे लक्ष्य गाठले. या दोन खेळाडूंसमोर दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज टिकू शकले नाहीत आणि पाकिस्तानने डोंगरासारख्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला.

पाकिस्तानने ३५३ धावांचे त्यांच्या वनडे इतिहासातील सर्वात मोठे सहज गाठले. यापूर्वी २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात पाकिस्तानने ३४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आता एकदिवसीय सामन्यात मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने नवा इतिहास घडवला आहे आणि प्रथमच ३५० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला आहे. यापूर्वी पाकिस्तानी संघाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आली नव्हती.

३५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. बाबर आझम (२३ धावा) आणि सौद शकील (१५धावा) चांगली कामगिरी करू शकले नाहीत. फखर जमानने नक्कीच चांगली सुरुवात केली, पण त्याला त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही आणि तो ४१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली नसली तरी शेवट मात्र कमाल झाला.

वाईट सुरूवातीनंतर पाकिस्तानचा पराभव निश्चित होता. पण पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सलमान अली आगा यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. दोन्ही खेळाडूंनी शतकं झळकावून पाकिस्तानी संघाला विजयापर्यंत नेले.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून टेम्बा बावुमाने ८२ आणि टोनी डी जॉर्जीने २२ धावा केल्या. मॅथ्यूज ब्रिटझकेने ८३ आणि हेनरिक क्लासेनने ८७ धावांचे योगदान दिले. आफ्रिकन संघासाठी तीन खेळाडूंनी अर्धशतकं झळकावली आणि या खेळाडूंमुळेच संघ एवढी मोठी धावसंख्या करू शकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan highest successful run chase in odis of 353 runs and beat south africa by 6 wickets in tri series bdg