सन २०१८ साली भारतात होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने धावाधाव करायला सुरुवात केली आहे. आंतराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांची पाकिस्तानी हॉकीचे अधिकारी भेट घेणार आहेत. दुबईत येत्या १० सप्टेंबरला ही भेट होणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर (निवृत्त) खालीद खोकर, सचिव शाहबाज अहमद यांनी बत्रांकडून पाकिस्तानी खेळाडूंना वेळेत व्हिसा मिळेल, याची हमी मागायचं ठरवलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे भारतात पार पडलेल्या अनेक महत्वाच्या स्पर्धांना पाकिस्तानी खेळाडूंना हजेरी लावता आली नाही. त्यातच सध्या पाकिस्तानविरोधात भारतामध्ये असलेलं वातावरण पाहता, खेळाडूंना होणारा विरोध लक्षात घेऊन पाकिस्तान हॉकी फेडरेशनने सावध पावलं उचलायचं ठरवलंय.
मात्र विश्वचषक ही महत्वाची स्पर्धा असल्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. याचसाठी आता आंतराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांच्याकडून पाकिस्तान बोर्डाचे अधिकारी हमी मागणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धांना सरकारने परवानगी नाकारली आहे. मलेशियात झालेल्या सुलतान अझलन शहा स्पर्धेत भारताने आक्षेप नोंदवल्यामुळे पाकिस्तान संघाला प्रवेश नाकारण्यात आला होता. २०१४ साली भारतात पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानने भारतावर मात केली होती. यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या विजयाचं बीभत्सपणे प्रदर्शन करत भारतीय चाहत्यांना उद्देशून आक्षेपार्ह वर्तन केलं होतं. या घटनेनंतर संतापलेल्या हॉकी इंडियाने पाकिस्तानला माफी मागायला भाग पाडलं होतं.
यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातले हॉकीमधले संबंध अजुनही बिघडलेले आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर तोडगा काढून दोन्ही देशांमध्ये पुन्हा पहिल्यासारखे सामने खेळवले जावेत, यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असल्याचं कळतंय. त्यामुळे पाकिस्तानच्या या प्रयत्नांना यश मिळतं का, हे पाहावं लागणार आहे.