भुवनेश्वर येथे २०१४मध्ये झालेल्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पध्रेच्या लढतीत केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल पाकिस्तानी खेळाडूंनी माफी मागावी, असे परखड मत भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगने व्यक्त केले.
पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या हॉकी इंडिया लीगमध्ये (एचआयएल) पाकिस्तानी खेळाडूंना न खेळवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना सरदार म्हणाला, ‘‘पाकिस्तानच्या खेळाडूंना याचा भरुदड सहन करावा लागत आहे, परंतु २०१४च्या चॅम्पियन्स चषक स्पध्रेतील त्यांची वागणूक चुकीची होती. त्या कृत्याची त्यांनी अजूनही माफी मागितलेली नाही. त्यामुळे त्यांना हॉकी इंडिया लीगमध्ये खेळवण्याची परवानगी देता कामा नये, असे मला
वाटते.’’
हॉकी इंडिया लीगच्या २०१३मधील पहिल्या सत्रात पाकिस्तानचे नऊ खेळाडू सहभागी होणार होते, परंतु देशातील राजकीय विरोधानंतर स्पध्रेपूर्वीच त्यांना मायदेशी परतावे लागले. त्यामुळे या स्पध्रेत आतापर्यंत झालेल्या तिन्ही हंगामांमध्ये एकाही पाकिस्तानी खेळाडूला खेळता आलेले नाही.