भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील क्रिकेट मालिकेला पुनरुज्जीवन मिळाल्यानंतर आता दोन देशांमधील हॉकी संघांमध्ये पुढील वर्षी मार्च महिन्यात हॉकी मालिकाही खेळवण्यात येणार आहे. भारतीय हॉकी संघही मे महिन्यात पाच सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार आहे.
हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा आणि पाकिस्तानी हॉकी महासंघाचे अध्यक्ष आसिफ बाजवा यांच्यात लाहोर येथे २९ डिसेंबरला झालेल्या बैठकीनंतर या दोन्ही मालिकेचा कार्यक्रम ठरविण्यात आला. ‘‘पाकिस्तानी हॉकी महासंघाच्या निमंत्रणानंतर मी दोन दिवसांसाठी पाकिस्तानात गेलो होतो. त्या वेळी झालेल्या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमधील हॉकी मालिका पुन्हा सुरू करण्याविषयी आम्ही निर्णय घेतला. नियोजित कार्यक्रमानुसार सर्वकाही घडल्यास, पाकिस्तानचा हॉकी संघ मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात येईल. त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाईल.’’ यापूर्वी २००६मध्ये अशा प्रकारची मालिका झाली होती.    

Story img Loader