चेन्नई : भारतात चेन्नईमध्ये हॉकीच्या मैदानावर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील झुंज बघायला मिळणार आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये भारतात होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी संघ पाठवण्यास पाकिस्तानने संमती दिली आहे.पाकिस्तानसह चीननेही खेळण्यास होकार दिला असल्याचे संयोजन समितीने मंगळवारी स्पष्ट केले. या स्पर्धेत आशियातील सर्वोत्तम सहा संघ खेळणार आहेत. त्यापैकी यजमान भारत, गतविजेते दक्षिण कोरिया, मलेशिया, जपान या चार देशांनी यापूर्वीच आपला सहभाग निश्चित केला होता. पाकिस्तान आणि चीन यांच्या सहभागाबाबत गुरुवापर्यंत निर्णय होईल, असे संयोजन समितीने सांगितले होते. मात्र, त्यापूर्वीच या दोन्ही देशांनी भारतात खेळण्याची तयारी दर्शवली आहे.

‘‘पाकिस्तानच्या होकारामुळे आम्ही आनंदी आहोत. चीनही येणार आहे. त्यामुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढेल,’’ असे हॉकी तमिळनाडूचे अध्यक्ष शेखर मनोहरन यांनी सांगितले. या स्पर्धेच्या निमित्ताने भारतात १७ वर्षांनी प्रथमच चेन्नईत हॉकीचे आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. त्याचबरोबर भारत-पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी प्रथमच भारतात एकमेकांसमोर येणार आहेत.

Story img Loader