आशिया चषकामध्ये आज बुधवार भारत आणि पाकिस्तान यांच्यात महासंग्राम होणार आहे. दोन्ही संघामधील हा १३० वा एकदिवसीय सामना आहे. दोन्ही संघाने हाँगकाँग संघाचा पराभव करत सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. भारताने सहा वेळा आशिया चषकावर नाव कोरले आहे. दोन्ही संघामध्ये अखेरचा सामना १८ जून २०१७ रोजी झाला होता. या सामन्यामध्ये पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यास आतुर असेल. पण भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मात्र पाकिस्तानलाच विजेता म्हणून पसंती दर्शाविली आहे.
भारतापेक्षा आशिया चषक जिंकण्यासाठी माझी पाकिस्तानला अधिक पसंती आहे. मानसिकदृष्ट्या पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा कणखर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला पाकिस्तानने पराभूत केले होते. त्यामुळे पाकिस्तानचे मनोधैर्य उंचावलेले असेल, असे ते म्हणाले.
प्रत्येक सामना सुरु होण्यापूर्वी किंवा प्रत्येक चेंडू फेकला जाण्यापूर्वी आधीच्या सामन्यांचा इतिहास कायम आपल्या डोक्यात असते. त्यामुळे भारताला आधीच्या सामन्यातील पराभव लक्षात असेल. त्यामुळे पाकिस्तानला या सामन्यात अधिक पसंती आहे. याशिवाय संघातील विराट कोहलीची अनुपस्थिती हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे, असेही गावसकर म्हणाले.