Pakistan delaying sign on CT 2025 hosting: २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने काही वेळापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) यजमानपदाचा करार पाठवला होता. सामान्यतः अशा कागदपत्रांवर ताबडतोब स्वाक्षरी केली जाते आणि परत ICCला दिली जाते. मात्र पाकिस्तानने त्यावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. वास्तविक, पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येणार याची खात्री हवी आहे.
खरं तर, पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी पीसीबीने सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढे जाण्यापूर्वी प्रख्यात वकिलांचा सल्ला घेतला आहे. यानंतर पीसीबीने आयसीसीला पत्र पाठवून करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी काही आक्षेप नोंदवले आहेत. पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येणार की नाही याबाबत शंका आहे त्यामुळे जोपर्यंत भारत खात्री देत नाही तोपर्यंत कोणतीही चूक करायची नाही असे ठरवले आहे.
हाती आलेल्या वृत्तानुसार, आयसीसी स्पर्धेत भारतीय संघ सहभागी न होण्याच्या शक्यतेने पाकिस्तान खरोखरच चिंतेत आहे. या चिंतेला अनुसरून परिषदेत संभाव्य परिणामांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. विशेषत: महसुलाच्या स्त्रोतांवर होणारा परिणाम, तसेच या नुकसानीची भरपाई कशी होईल याबाबत चौकशी करण्यात आली. आयसीसीने अद्याप कोणतीही लेखी प्रतिक्रिया जारी केलेली नाही आणि या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी चर्चा सुरू आहे.
इनसाईड स्पोर्ट्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि सीईओ ज्योफ अॅलार्डिस यांच्या पाकिस्तान दौऱ्यामागे हा करार मुख्य हेतू होता. या बैठकीदरम्यान, PCB ने पाकिस्तान सुपर लीग (PSL) आणि इतर उपक्रमांसारख्या कार्यक्रमांद्वारे भरीव महसूल निर्माण करण्याच्या क्षमतेचा दाखला देत, ICC कडे आपले आर्थिक स्वातंत्र्य निदर्शनास आणून दिले. पीसीबीने स्पष्ट केले की ते केवळ आयसीसीच्या निधीवर अवलंबून नाही त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्वत:चे स्त्रोत आहेत.
याप्रकरणी आयसीसीने अद्याप लेखी प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच, आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आयसीसी आणि पीसीबीचे अधिकारी चर्चा करत आहेत. आतापर्यंत, पीसीबीने एक बाजूचा करार केला आहे परंतु जोपर्यंत ICC किंवा BCCI त्यांना लेखी आश्वासन देत नाही किंवा त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत या करारावर निर्णय होणार नाही. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यावर ठाम आहे. सरकारच्या परवानगीशिवाय संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. भारत सरकार रोहित शर्मा आणि कंपनीला पाकिस्तानात खेळण्यास परवानगी देण्याची शक्यता नसल्यामुळे, आयसीसी आता अडचणीत आली आहे.