पुढील महिन्यात भारतात होणाऱया ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेण्याबाबात पाकिस्तान संघ साशंक आहे. संघातील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानचे सामने बाहेर खेळवले जावेत, असा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आग्रह आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) त्याबाबत कोणताही विचार नसल्याने पाकिस्तानने अद्याप आपल्या संघाला भारतात पाठविण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
पुढील महिन्यात ८ मार्चपासून सुरू होणाऱया आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात नुकतीच दुबईत आयसीसीची बैठक झाली. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान देखील उपस्थित होते. पाकिस्तान सरकारने परवानगी दिली आणि भारतातील सुरक्षिततेबाबत खात्री पटली तरच पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेत उतरेल, असे शहरयार यांनी सांगितले.