PCB on Pakistan Team: २०२३मध्ये एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघ अडचणीत सापडला आहे. आशिया चषक २०२३च्या सुरुवातीला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा पाकिस्तान संघ अंतिम फेरीतही पोहोचू शकला नाही. भारत आणि श्रीलंकेकडून पराभूत होऊन हा संघ सुपर-४ फेरीतून बाहेर पडला. याहून त्रासदायक बाब म्हणजे या स्पर्धेत संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू जखमी झाले. त्यामुळे विश्वचषक २०२३साठीच्या संघ निवडीआधी पीसीबीच्या मिटिंगमध्ये यावर चर्चा झाली आणि संघ व्यवस्थापनाला काही कठोर प्रश्न विचारण्यात आले. यावरून वातावरण थोडे गरम झाले होते.
नसीम शाहला विश्वचषक खेळणे कठीण जात आहे. हारिस रौफ आणि आगा सलमानही जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघ अडचणीत सापडला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, सर्व संघांना २८ सप्टेंबरपर्यंत १५ सदस्यीय संघ निश्चित करायचा आहे. यानंतर संघात कोणताही बदल करण्यासाठी बोर्डाला आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल. या कारणास्तव, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी आपला १५ सदस्यीय संघ निश्चित करण्यापूर्वी आशिया कपमधील संघाच्या खराब कामगिरीचा आढावा घेतला.
पीसीबी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी एका निवेदनात सांगितले की, “या पुनरावलोकनामागील कारण खुल्या चर्चेचे वातावरण निर्माण करणे आणि एकमत विकसित करणे हे होते. कामगिरीवर चर्चा करण्यासाठी सर्वांना एकत्र आणणे, समस्या ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे ही कल्पना आहे.” मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर, कर्णधार बाबर आझम, उपकर्णधार शादाब खान, माजी कर्णधार मिसबाह-उल-हक आणि मोहम्मद हाफीझ यांनीही आढावा बैठकीला हजेरी लावली.
मुख्य निवडकर्ता आणि माजी कर्णधार इंझमाम-उल-हक ‘वैद्यकीय इमर्जन्सी’मुळे बैठकीला उपस्थित राहू शकला नाही, परंतु त्याने गुरुवारी पीसीबी प्रमुखांसह आपले म्हणणे मांडले. मुख्य प्रशिक्षक ग्रँट ब्रॅडबर्न, फलंदाजी प्रशिक्षक अँड्र्यू पुटिक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्यासह पुरुषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षक कर्मचाऱ्यांच्या इतर सदस्यांनाही संघाच्या अलीकडील कामगिरीचा अहवाल देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
इंझमाम-उल-हक म्हणाला, “आम्हाला संघाचे सकारत्मक गुण आणि कमकुवतपणाबद्दल चर्चा करावी लागेल, जेणेकरून आम्हाला आमच्या संघाच्या भल्यासाठी काय आणि कोठे काम करायचे आहे, हे स्पष्ट होऊ शकेल.” ‘सुपर फोर’मध्ये भारत आणि श्रीलंकेकडून पराभूत होऊन आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात पाकिस्तानला अपयश आले. त्यांना फक्त नेपाळ आणि बांगलादेशविरुद्ध विजय मिळवता आला.
डॉ. सोहेल सलीम यांनी खेळाडूंना त्यांच्या दुखापतींबद्दल आणि “खेळाडूंच्या पुनर्वसन कार्यक्रमासाठी पुढे जाण्याचा मार्ग” याबद्दल माहिती दिली, असे पीसीबीने सांगितले. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि हारिस रौफ हे दोघे कोलंबोमध्ये भारताविरुद्धच्या पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात खेळू शकले नाहीत. दुखापतीमुळे नसीम शाहच्या विश्वचषक स्पर्धेत समावेश करण्यात आला नाही त्याच्या जागी हसन अलीला संधी देण्यात आली.
“एक मजबूत विश्लेषणामध्ये, संघाची अलीकडील कामगिरी, खेळाडूंची तंदुरुस्ती आणि भविष्यातील योजना या सर्व बाबींवर संघात सुधारणा करण्याच्या उद्देशाने चर्चा करण्यात आली,” असे पीसीबीच्या निवेदनात म्हटले आहे. “खेळाडूंच्या वर्कलोडवर एक चांगला दृष्टीकोन आणि रणनीती घेण्यावर सहमती झाली. पाठीला बळकटी देण्याच्या महत्त्वावरही भर देण्यात आला,” असेही सांगण्यात आले.