पुलवामा हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर, सर्वत स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने स्विकारल्यानंतर भारताकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात झाली. याचाच एक भाग म्हणून आगामी विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी सध्या सर्व स्तरातून होते आहे. मात्र पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने, राजकीय फायद्यासाठी क्रिकेटला टीकेचं लक्ष्य करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
“भारत आणि पाकिस्तान यांच्यातला विश्वचषकाचा सामना वेळापत्रकानुसार खेळवला जावा. जगभरातून कोट्यवधी प्रेक्षक हा सामना पाहत असतात. राजकीय फायद्यासाठी क्रिकेटला लक्ष्य करणं योग्य नाही. पुलवामा हल्ल्यानंतर क्रिकेटला पुन्हा एकदा लक्ष्य केलं जात आहे, जे चुकीचं आहे. खेळ हा खेळाच्या भावनेनेच खेळला जावा. पाकिस्तानने कधीच राजकारण आणि खेळ यांची सरमिसळ केलेली नाही.” सरफराजने आपलं मत मांडलं.
अवश्य वाचा – पाकिस्तानसोबत खेळायचे की नाही याचा निर्णय सरकारच्या हातात – कपिल देव
16 जून रोजी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट विश्वचषकात समोरासमोर येणार आहेत. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर हा सामना होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. भारतामधून सौरव गांगुली, हरभजन सिंह यासारख्या माजी खेळाडूंनी पाकविरुद्ध क्रिकेट खेळू नये असं मत व्यक्त केलं आहे. तर सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर यांच्यासाठी खेळाडूंनीही, पाकिस्तानची न खेळता त्यांचा फायदा करुन देण्यापेक्षा मैदानात उतरुन सामना जिंकत पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली द्या असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे विश्वचषकातील भारत-पाक सामन्याबद्दल नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचा निर्णय सरकारशी चर्चेनंतरच!