Fakhar Zaman says Will miss playing in India : भारत आणि पाकिस्तानने नुकतेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक फायनल केले. त्याचबरोबर एक करार केला आहे. ज्यानुसार दोन्ही देश एकमेकांद्वारे आयोजित बहु-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तटस्थ ठिकाणी त्यांचे सामने खेळतील. त्यामुळे भविष्यात भारत आणि पाकिस्तान आता एकमेकांच्या देशात खेळताना दिसणार नाहीत. अशात पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने भारतात खेळण्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

भारतात खेळण्याची उणीव नक्कीच भासणार –

भारत चॅम्पियन्स ट्रॉफीतील गट फेरीतून पुढच्या फेरीत गेला, तर पुढील सर्व सामने दुबईत खेळेल. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी फखर जमान एका चॅनेलवर म्हणाला, ‘होय, आम्हाला भारतात खेळण्याची उणीव नक्कीच भासणार आहे. कारण आम्ही २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तिथे गेलो होतो. आम्हाला तिथे मिळालेला पाठिंबा आणि आदरातिथ्य यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत.’

दुबईत भारताविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक –

फखर जमान पुढे म्हणाला, ‘जेव्हा आम्ही पहिल्यांदा हैदराबादला गेलो तेव्हा तेथील स्थानिक लोकांनी आमचे मनापासून स्वागत केले. त्यांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. होय, आता आम्ही हे सगळं मिस करू. भारत पाकिस्तानात आला असता तर आम्ही त्यांचे आणखी भव्य स्वागत आणि आदरातिथ्य केले असते, पण ते येत नाहीत. हे ठीक आहे, पण दुबईत त्यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

हेही वाचा – MS Dhoni : एमएस धोनीच्या सन्मानार्थ सरकार सात रुपयांचे नाणे आणत आहे? काय आहे सत्य? जाणून घ्या

२०१२ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली गेली नाही. पाकिस्तानने शेवटचा २०१२ मध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. दुसरीकडे, भारताने शेवटचा पाकिस्तानचा दौरा आशिया कप २००८ दरम्यान केला होता. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर टीम इंडियाने शेजारच्या देशात एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. तथापि, आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६ आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी पाकिस्तानने भारताचा दौरा केला आहे.

Story img Loader