क्रिकेट संघात निवड प्रक्रियेदरम्यान सतत मिळणाऱ्या डच्चूने त्रस्त होऊन, पाकिस्तानातील एका क्रिकेटपटूने भर सामन्यात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुलाम हैदर अब्बास असं या खेळाडूचं नाव असून तो लाहोर क्रिकेट असोसिएशनकडून स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळतो. निवड समितीमधले सदस्य संघात निवड होण्यासाठी आपल्याकडे सतत लाच मागतात, आणि पैसे नसल्याने संघात आपल्याला नेहमी डावललं जात असल्याचा आरोप करत गुलामने सामना सुरु असताना स्वतःवर पेट्रोल ओतून जीव देण्याचा प्रयत्न केला.

हा सामना पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांच्या नजरेस हा प्रकार पडला, आणि त्यांनी तात्काळ गुलामला थांबवत अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुलामची समजूत काढत होणारा अनर्थ टाळला. यानंतर चौकशीदरम्यान, निवड प्रक्रियेच्या वेळी येणाऱ्या सततच्या अपयशाला कंटाळून आपण हे पाऊल उचलल्याचं गुलामने सांगितलं.

स्थानिक पातळीवरच्या सामन्यांमध्ये मी सतत चांगली कामगिरी करत होतो. मात्र केवळ मी गरीब घरातून आल्यामुळे माझ्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. त्यानंतर काही दिवसांनी निवड समितीच्या सदस्यांनी मला संघात निवड होण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यामुळे मी पुरता निराश झालो होतो, याच कारणामुळे आपण आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं गुलाम अब्बासने सांगितलं.

माझ्या सांगण्याकडे लक्ष दिलं नाही तर मी गदाफी मैदानासमोर आत्महत्या करेन, आणि त्यासाठी लाहोर क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी जबाबदार असतील असंही गुलामने म्हणलंय.

Story img Loader