विश्वचषकापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट संघाचे आव्हान कमकुवत झाले आहे. वेगवान गोलंदाज जुनैद खान दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे जुनैद त्रस्त होता. सोमवारी घेण्यात आलेल्या तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरल्याने जुनैदची विश्वचषक वारी हुकणार आहे. ‘‘दुर्दैवाने मला विश्वचषकात खेळता येणार नाही. गेल्या वर्षभरात मला दुखापतींनी सतावले आहे. विश्वचषक हा क्रिकेटचा मानबिंदू आहे, त्यात खेळण्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटू उत्सुक असतो. मात्र शंभर टक्के तंदुरुस्त नसताना खेळणे धोक्याचे आहे. हे अत्यंत निराशाजनक आहे,’’ असे जुनैद खानने सांगितले. २५ वर्षीय जुनैदने एकदिवसीय सामन्यांमध्ये ७५ बळी घेतले आहेत. गोलंदाजीची शैली संशयास्पद ठरल्याने फिरकीपटू सईद अजमलने विश्वचषकातून माघार घेतली आहे. अजमलसह जुनैदही उपलब्ध नसल्याने पाकिस्तानच्या अन्य गोलंदाजांवरचे दडपण वाढले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने जुनैदऐवजी पर्यायी खेळाडूची घोषणा केलेली नाही.
पाकिस्तानचा जुनैद खान विश्वचषकाला मुकणार
विश्वचषकापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट संघाचे आव्हान कमकुवत झाले आहे. वेगवान गोलंदाज जुनैद खान दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
First published on: 03-02-2015 at 12:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan pacer junaid khan out of world cup