Saim Ayub escaped injury due to Sydney’s bad cricket ground Outfield : ऑस्ट्रेलियामध्ये जगातील सर्वात सुंदर आणि हायटेक क्रिकेट मैदाने आहेत. पण दुरून सुंदर दिसणार्या या क्रिकेट मैदानांचे वास्तव काही वेगळे आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदान हे क्रिकेटच्या ऐतिहासिक मैदानांपैकी एक आहे, परंतु या ऐतिहासिक मैदानाच्या खराब आऊटफिल्डमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा पर्दाफाश झाला. पाकिस्तानचा एक खेळाडू येथे क्षेत्ररक्षण करताना दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावला, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिडनीमधील सिडनी क्रिकेट ग्राउंड हे कसोटी इतिहासातील सर्वात जुन्या मैदानांपैकी एक आहे. हे ऐतिहासिक मैदान १८५४ मध्ये सुरू करण्यात आले होते, ज्याची आसन क्षमता ४८ हजार आहे. सध्या, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना या मैदानावर खेळला जात आहे, ज्यामध्ये मैदानातील एका भागाची आऊटफिल्ड खराब असल्याची दिसून आली.
मैदानाच्या खराब आऊटफिल्डचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये पाकिस्तानचा युवा खेळाडू सैम अयुब चेंडूला अडवण्यासाठी त्याच्या मागे धावला आणि जवळ पोहोचताच त्याने डायव्हिंग केले. पण खराब आऊटफिल्डमुळे सैमला नीट डायव्ह करता आले नाही. कारण आऊटफिल्डच्या मातीत त्याचा पाय रुतला. त्यानंतर तेथील आऊटफिल्डचा काही भाग उपसून वर आला.
यादरम्यान कसोटी पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अयुबला गंभीर दुखापत झाली असती, पण सुदैवाने त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मैदानावरील मातीत पाय रुतल्यानंतर सॅम अय्युबने पुन्हा उठून चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या. त्यानंतर स्लो मोशनमध्ये व्हिडिओही दाखवण्यात आला, ज्यामध्ये पाकिस्तानी क्षेत्ररक्षकाचा गुडघा आऊटफिल्डमध्ये अडकल्याचे दिसले, त्यामुळे तेथील माती बाहेर आली.