पाकिस्तानी संघाचा खेळाडू उमर अकमलने प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मिकी आर्थर यांनी मला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली असा आरोप उमर अकमलने केला आहे. डेली पाकिस्तान या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे. नुकतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून उमर अकमलला डावललं होतं.

उमर अकमलने आपल्या संघातील खेळाडूंसोबत सराव करण्याची परवानगी आर्थर यांच्याकडे मागितली. “यावेळी निवड समिती प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हक उपस्थित होते. या सर्वांसमोर आर्थर यांनी मला शिवीगाळ केली. सिनीअर खेळाडूंसोबत सराव करण्यापेक्षा क्लब लेवलवर क्रिकेट खेळ, असं म्हणत आर्थर यांनी मला शिवीगाळ केली. यावेळी माझे सहकारी तिकडे हजर होते…तरीही त्यापैकी एकानेही यात मध्यस्थी करण्याची तसदी घेतली नाही.” माझ्यासाठी ही बाब खूप वेदनादायक होती, असंही अकमल म्हणाला.

चॅम्पियन्स करंडकात सुरुवातीला पाकिस्तानच्या संघात उमर अकमलची निवड झालेली होती. मात्र वारंवार फिटनेस टेस्ट पास करण्यात अपयशी ठरल्याने त्याला संघातून वगळण्यात आलं. मात्र यानंतर आपण आपल्या फिटनेसवर सतत काम करत असल्याचं उमर अकमलने म्हणलं आहे. याचसाठी आपण संघातील खेळाडूंसोबत सराव करण्याची परवानगी मागण्यासाठी आर्थर यांच्याकडे गेलो असताना, आर्थर यांनी मला शिवीगाळ केल्याचं अकमलचं म्हणणं आहे.

त्यामुळे या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेमकी काय कारवाई करतंय हे पहावं लागणार आहे.

Story img Loader