उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे कारवाई

पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाह हा उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याच्यावर तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या वेळी त्याची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती, अशी माहिती आयसीसीने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

यासिरने आयसीसीच्या उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या नियमावलींचे उल्लंघन केले असल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अबू धाबी येथे इंग्लंडविरुद्ध १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्याच्या वेळी ही चाचणी घेण्यात आली होती. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने बंदी घातलेल्या औषधांपैकी एक उत्तेजक यासिरने घेतले असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर आयसीसीच्या शिस्तभंग समितीने तयार केलेल्या प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

यासिरवरील बंदीमुळे संघापुढे समस्या -रशीद

यासिरवर घातलेल्या बंदीमुळे न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी संघ निवडताना समस्या निर्माण झाली आहे. यासिरवर संघाची मोठी मदार होती. सध्या आमच्या संघापुढे रोज नवीन अडचणी उभ्या राहत आहेत. या अडचणींमध्ये ही नवी भर पडली आहे, असे पाकिस्तानच्या निवड समितीचे मुख्य हारून रशीद यांनी सांगितले.

Story img Loader