वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाच्या कामगिरीबाबत ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने संशय व्यक्त केल्यामुळे पाकिस्तान संघातील खेळाडू प्रचंड रागावले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सूचनेमुळे कुणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार नसले तरी संघातील प्रत्येक जण रागावला असल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. ‘‘पाकिस्तान संघ चांगली कामगिरी करतो किंवा एखादी मालिका जिंकतो, त्यावेळी अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप आमच्यावर केले जात आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी असे प्रकार घडत आहेत. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे,’’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि पाचवा सामना संशयास्पद असल्याचा दावा ‘डेली मेल’ने केला आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांनी काही षटके तुफान फटकेबाजी केल्यानंतर त्यानंतरची काही षटके आरामात खेळून काढली. तसेच पाकिस्तानने जाणुनबुजून तिसरा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला, असा दावाही या वृत्तपत्राने केला आहे.