टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियाने ५ गडी आणि ६ चेंडू राखून पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानी संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशेची छटा स्पष्ट दिसत होती. नेटकरीही पाकिस्तान संघावर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचं खच्चीकरण होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाचं पाठराखण करत ट्वीट केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान माजी क्रिकेटपटू असून त्यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला आहे.

“बाबर आझम आणि संघाला: मला माहिती आहे, तुम्हाला आता काय वाटत असेल. क्रिकेटच्या मैदानावर मला अशाच निराशेचा सामना लागला आहे. पण तुम्ही खेळलेल्या क्रिकेटच्या गुणवत्तेचा आणि तुमच्या विजयात तुम्ही दाखवलेल्या नम्रतेचा तुम्हा सर्वांना अभिमान असेल. ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन”, असं ट्वीट पाकिस्तानचे पंतप्राधान इम्रान खान यांनी केलं आहे.

T20 WC PAK vs AUS : “कॅप्टन म्हणून मी समाधानी…” स्पर्धेबाहेर गेल्यानंतर पाकिस्तानच्या बाबर आझमची प्रतिक्रिया!

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला तंगवले. रिझवानने ६७ तर जमानने नाबाद ५५ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला. १९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता या स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.