लाहोर : चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानात खेळविण्यासाठी आग्रह धरणारे पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) प्रत्यक्षात स्पर्धेच्या तयारीत मागे पडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. स्पर्धेतील भारताचे वगळून अन्य सर्व सामने पाकिस्तानात होणार आहेत.
अनेक वर्षांनी पाकिस्तानात मोठी ‘आयसीसी’ स्पर्धा होत असली, तरी त्याचा फायदा उठवण्यात सध्या तरी ‘पीसीबी’ला यश आलेले नाही. स्पर्धेसाठी पाच आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना सर्व मैदानांची तयारी अर्धवट आहे.
लाहोर येथील कर्नल गडाफी स्टेडियम, कराचीतील नॅशनल स्टेडियम, रावळपिंडी अशा तीन केंद्रांवर सामने होणार आहेत. मात्र, या तीनही मैदानांवर अद्याप नूतनीकरणाचे काम संपलेले नाही. ‘आयसीसी’ने तयारीचा आढावा घेतल्यानंतर मैदाने वेळेत पूर्ण होतील याबाबत शंका उपस्थित केली आहे.
‘आयसीसी’चे निरीक्षक या तयारीबाबत पूर्ण निराश आहेत. पाकिस्तानातील मैदानांवर जी काही तयारी सुरू आहे, ते नूतनीकरण नाही, तर नव्याने बांधकाम केले जात असून, ते पूर्ण होण्यास आता पुरेसा अवधी राहिलेला नाही. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच, प्रकाशझोत इतकेच नाही तर खेळपट्टी आणि सभोवतालचे मैदानही अजून पूर्णावस्थेत नाही, असे निरीक्षकाने म्हटल्याचे कळते आहे.
मैदानाची कामे पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला ३१ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली होती. ती उलटून गेल्यावर ही परिस्थिती असल्यामुळे आता सर्व मैदाने ‘आयसीसी’कडे सुपूर्द करण्याची १२ फेब्रुवारीची अंतिम मुदतही धोक्यात आली आहे. एका क्षणी संपूर्ण स्पर्धाच संयुक्त अरब अमिरातीत स्थानांतरित करण्याच्या चर्चेने वेग घेतला आहे.
अखेर ‘पीसीबी’ला जाग
भारताच्या नकारामुळे स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसार चॅम्पियन्स करंडक स्पर्धा खेळवली जात असल्यामुळे ‘पीसीबी’चे अर्धे खच्चीकरण झाले होते. त्यामुळे त्यांचे तयारीकडे दुर्लक्ष राहिले, असा मतप्रवाह पुढे येत असतानाच पुरेशा तयारीअभावी संपूर्ण स्पर्धाच संयुक्त अरब अमिरातीत स्थानांतरित करण्याच्या चर्चेने ‘पीसीबी’ला खडबडून जाग आली आहे. तयारीमध्ये हवामानाची अडचण येत असल्याचे कारण पुढे करत ‘पीसीबी’ सारवासारव करू लागले आहे. चिंता करण्याचे कारण नाही. दिवस-रात्र काम करून सर्व मैदाने वेळेवर पूर्ण केली जातील, असा विश्वास आता ‘पीसीबी’ने व्यक्त केला आहे. यासाठी आता अडीचशेहून अधिक कर्मचारी त्यांनी कामावर तैनात केले आहेत.