मुलतानच्या सपाट खेळपट्टीवर ५५६ धावांचा डोंगर उभारूनही अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलेल्या पाकिस्तानने अवघ्या तीन दिवसात किमयागार असा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे त्याच मुलतानच्या भूमीवर पाकिस्तानने बॅझबॉल पवित्र्यासह खेळणाऱ्या इंग्लंडला चीतपट करण्याची किमया केली आहे. या विजयामुळे तीन सामन्यांची मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. तिसरी कसोटी रावळपिंडी इथे होणार आहे.

मुलतान इथे झालेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने ८२३ धावा करत पाकिस्तानला नामोहरम केलं. पाकिस्तानचा दुसरा डाव झटपट गुंडाळत इंग्लंडने अविश्वसनीय असा डावाच्या फरकाने विजय मिळवला. या विजयाने असंख्य नवे विक्रम प्रस्थापित झाले. प्रचंड उकाड्यात आणि आर्द्र वातावरणात दमदार खेळ करणाऱ्या इंग्लंडचं कौतुक झालं तर घरच्या मैदानावर सुमार खेळ करणाऱ्या पाकिस्तान संघावर प्रचंड टीका झाली.

बाबर आझमला डच्चू; कामरानचं शतकी पदार्पण

बाबर आझम हा पाकिस्तानचा प्रमुख फलंदाज आहे. मात्र बाबरने डिसेंबर २०२२ नंतर कसोटीत अर्धशतक किंवा त्यापेक्षा मोठ्या धावांची खेळी केलेली नाही. संघाचा प्रमुख फलंदाजच अपयशी ठरत असल्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता येण्यातही अपयश येत होतं. बाबर माजी कर्णधारही आहे. त्यामुळे बाबरला वगळल्यास चुकीचा संदेश जाईल असाही मतप्रवाह होता. मात्र मुलतानच्या पहिल्या कसोटीनंतर नव्या निवडसमितीने बाबरला डच्चू देण्याचा निर्णय घेतला. ज्या सामन्यात पाकिस्तानने ५५६ आणि इंग्लंडने ८२३ धावा कुटल्या त्या सामन्यात बाबरला केवळ .. धावाच करता आल्या. या सर्वसाधारण कामगिरीमुळे बाबरला डच्चू देण्यावर शिक्कामोर्तब झालं. बाबरच्या जागी कामरन गुलामला पदार्पणाची संधी देण्यात आली. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ५०च्या सरासरीने खेळणाऱ्या कामरानने निवडसमितीचा विश्वास सार्थ ठरवत तडाखेबंद शतकी खेळी साकारली.

साजिद-नोमानची जोडी जमली रे

पाकिस्तानने या कसोटीसाठी ३८वर्षीय नोमान अली आणि ३१वर्षीय साजिद खान यांना अंतिम अकरात समाविष्ट केलं. दोघंही या आधीही पाकिस्तानसाठी खेळले आहेत. नोमान ३८व्या वर्षी प्रचंड उकाड्यात आणि आर्द्र वातावरणात पाच दिवस खेळू शकेल का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. निर्जीव खेळपट्टीवर साजिदच्या गोलंदाजीवर इंग्लंडचे फलंदाज तुटून पडतील अशीही चर्चा होती पण हे दोघेच पाकिस्तानच्या विजयाचे शिल्पकार ठरले. इंग्लंडच्या पहिल्या डावात साजिदने ७ तर नोमानने ३ विकेट्स पटकावल्या. या दोघांनी मिळून ५४ षटकं टाकली. बाकी गोलंदाजांनी मिळून अवघी १३ षटकं टाकली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात तर फक्त या दोघांनीच गोलंदाजी केली. नोमानने ४६ धावांत ८ विकेट्स घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. साजिदने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून ३३.३ षटकं टाकली. शाहीन शहा आफ्रिदी आणि नसीम शहा यांना वगळून या दोघांना संघात घेतल्यानंतरही जोरदार टीका झाली होती. शाहीन शहा हा जगातल्या सर्वोत्तम युवा वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. पण या दोघांनी सगळी जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत पाकिस्तानला दिमाखदार विजय मिळवून दिला.

सईम अयुबवर ठेवला विश्वास

सलामीवीर सईम अयुबची कामगिरी पहिल्या कसोटीत तसंच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत चांगली झाली नव्हती. पण संघव्यवस्थापनाने सईमववर विश्वास ठेवला. सईमने या संधीचं सोनं करत पहिल्या डावात ७७ धावांची संयमी खेळी साकारली. पाकिस्तानने पहिल्या डावात ३६६ धावांची मजल मारली. सईमच्या खेळीने या धावसंख्येचा पाया रचला गेला. मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स आणि जॅक लिच, शोएब बशीर या आक्रमणाचा सामना करत सईमने अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या डावात त्याने २२ धावा केल्या.

सलमान अघाची महत्त्वपूर्ण खेळी

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या फलंदाजाला तळाच्या मंडळींना घेऊन खेळावं लागतं. स्ट्राईक आपल्याकडे राहील यासाठी नियोजन करावं लागतं. गेल्या ३ वर्षात सलमान अघा हा पाकिस्तानसाठी कसोटीतला महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. सातव्या क्रमांकावर फलंदाजी, उपयुक्त फिरकी आणि उत्तम क्षेत्ररक्षण ही सलमान अघाची गुणवैशिष्ट्यं आहेत. अघाने पहिल्या डावात ३१ तर दुसऱ्या डावात ६३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. दुसऱ्या डावातील खेळीमुळेच पाकिस्तानला इंग्लंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवता आलं. कठीण अशा खेळपट्टीवर सलमान अघाने जिद्दीने खेळ केला.

टीका-ट्रोलिंगकडे दुर्लक्ष आणि नवीन निवडसमिती

मुलतानच्या पहिल्या कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान संघावर प्रचंड टीका झाली होती. पाकिस्तानचा कसोटी दर्जा काढून घ्यावा असंही म्हटलं गेलं. पाकिस्तानच्या संघात घाऊक बदल व्हायला हवेत असंही तज्ज्ञांनी सांगितलं. कर्णधार शान मसूदची कर्णधारपदावरून तात्काळ हकालपट्टी व्हावी असा सूर होता. पाकिस्तानचे माजी खेळाडू, युट्यूबर्स, चाहते यांनी सोशल मीडियावर संघावर जोरदार टीका केली. जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानच्या खेळाला उद्देशून मीम्स तयार केले. पण पाकिस्तानच्या संघाने या कशानेही खचून न जाता दिमाखात पुनरागमन केलं. कर्णधार शान मसूदने पहिल्या कसोटीनंतर बोलताना काळजीपूर्वक मांडणी केली. त्याने पराभवाचं खापर कोण्या एका खेळाडूवर फोडलं नाही. त्या अनपेक्षित पराभवानंतर पाकिस्तानने निवडसमितीच बदलून टाकली. नव्या रचनेत आकिब जावेद, अलीम दार, अझर अली, असाद शफीक आणि हसन चीमा हे निवडसमितीचा भाग झाले. या पाच सदस्यीय निवडसमितीने निवडलेल्या संघानेच चमत्कार घडवत विजय मिळवून दिला.