तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १२७ धावांनी मात
इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकत पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात टाकली आहे. पाकिस्तानने इंग्लंडपुढे विजयासाठी २८४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानने इंग्लंडला १५६ धावांमध्ये गुंडाळत १२७ धावांनी विजय मिळवला.
गुरुवारी २ बाद ४६ या धावसंख्येवरून पुढे खेळताना इंग्लंडला दुसऱ्या षटकात जो रुटला (६) गमवावे लागले. त्यानंतर सातत्याने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि पाकिस्तानने विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने ४ चौकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी साकारत एकाकी लढत दिली. पण शोएब मलिकने त्याचा अडसर दूर करीत संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. कुक बाद झाल्यावर सहा धावांमध्ये इंग्लंडचा डाव संपुष्टात आला.
या सामन्यातील दुसऱ्या डावात १५१ धावांची खेळी साकारणाऱ्या मोहम्मद हफिझला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला, तर मालिकेत भेदक मारा करणारा फिरकीपटू यासिर शाहला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

युनिस खानचे पाकिस्तानी संघात पुनरागमन
कराची : पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनिस खानचे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात पुनरागमन झाले आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर युनिसला एकदिवसीय संघात मिळालेली ही पहिली संधी आहे. दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू इमाद वसिमला या संघातून वगळण्यात आले आहे.
पाकिस्तानचा संघ : अझर अली (कर्णधार), अहमद शेहझाद, मोहम्मद हफिझ, युनिस खान, शोएब मलिक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सर्फराझ अहमद, अन्वर अली, आमीर यामीन, यासिर शाह, झफर गोहर, वहाब रियाझ, मोहम्मद इरफान, राहत अली आणि बिलाल आसिफ.