भारतीय क्रिकेटमध्ये IPL ही एक लोकप्रिय स्पर्धा आहे. IPL मुळे नवोदित क्रिकेटपटूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना संधी मिळते. आतपर्यंत IPL मधील अनेक सामने रंगतदार झाले आहेत. IPL चे आयोजन पाहूनच काही वर्षांपासून पाकिस्तान मध्येदेखील PSL चे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. पण भारत-पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे पाकच्या खेळाडूंना IPLमध्ये प्रवेश दिला जात नाही. याच मुद्द्यामुळे पाकिस्तानचे काही खेळाडू IPL नावं ठेवतात तर काही खेळाडू स्पर्धेची स्तुती करतात. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही नुकतंच IPLसंदर्भात मोठं वक्तव्य केलं.
“IPL हा खूप मोठा आणि लोकप्रिय ब्रँड आहे. ही स्पर्धा म्हणजे नव्या दमाच्या खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. IPLमध्ये खेळल्याने दडपणाच्या स्थितीत कशाप्रकारे खेळ करावा याची समज येते. तसेच दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केल्याने अनेक महत्त्वाचे सल्ले मिळतात. पाकिस्तानकडे सध्या बाबर आझमसारखे अनेक नवखे खेळाडू आहेत. IPL न खेळायला मिळाल्याने हे खेळाडू खूप गोष्टींना मुकत आहेत”, असे आफ्रिदी म्हणाला.
“प्रेम हे प्रेम असतं. ते सगळीकडे सारखंच असतं. मी भारतात क्रिकेट खेळणं नेहमीच एन्जॉय केलं. भारतीय क्रिकेटप्रेमींनी मला दिलेल्या प्रेमाचं आणि आदराचं मी नेहमीच कौतुक केलं आहे. आतासुद्धा मी जेव्हा सोशल मीडियावर एखादं मत मांडतो तेव्हा मला अनेक भारतीयांचे मेसेज येतात आणि त्यातील अनेकांना मी रिप्लायही करतो. मला असं वाटतं की माझा भारतातील क्रिकेटबद्दलचा अनुभव अफलातून होता”, असंही आफ्रिदीने नमूद केलं.