‘‘हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे वक्तव्य आणि विरोध आमच्या भावना दुखावणारे आहे. या पाश्र्वभूमीवर १९ मार्चला धरमशाला येथे भारताविरुद्धचा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील सामना पाकिस्तानने खेळू नये,’’ असे
मत पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे.
हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांचे भाष्य ऐकून मी निराश झालो आहे, अशी प्रतिक्रिया इम्रानने ‘डॉन न्यूज’ वृत्तपत्रातील वृत्तात व्यक्त केली आहे. इम्रान म्हणाले, ‘‘हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केले असून, त्यांचे वागणे आदरातिथ्य आणि यजमानपदाच्या पूर्णत: विरोधात आहे.’’
‘‘सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानी संघाने हिमाचल प्रदेशमध्ये खेळावे, असे मला वाटत नाही,’’ असे इम्रानने पुढे सांगितले.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भारत दौऱ्याचा व्हिसा
कराची : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या दोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांना व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने केलेल्या विनंतीनुसार, रविवारी भारतीय उच्चायुक्तालयाकडून या दोघांना व्हिसा देण्यात आले आहेत.