पाकिस्तान प्रिमिअर लीगमध्ये फिरकीपटू राशिद खानच्या गोलंदाजीची जादू अनुभवायला मिळाली. राशिद खाननं त्याच्या टी २० कारकिर्दीतील सर्वात चांगला स्पेल टाकला. त्याने चार षटकात २० धावा देत ५ गडी बाद केले. राशिदच्या गोलंदाजीसमोर पेशावर जाल्मीच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे लाहोर कलंदर्सने पेशाववर जाल्मीला १० धावांनी पराभूत केलं. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आलं.

पेशावर जाल्मीने नाणेफेक जिंकत लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. लाहोर कलंदर्सने २० षटकात ८ गडी गमवून १७० धावा केल्या. या धावांचं लक्ष्य गाठताना पेशावर जाल्मी संघाला २० षटकात ८ गडी गमवून १६० धावा करता आल्या. पेशावर जाल्मीचा लाहोर कलंदर्सविरोधातील दुसरा पराभव आहे. विजयी लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पेशावर जाल्मी संघाने पहिल्या दोन षटकात दोन गडी गमावले होते. त्यामुळे संघावर दडपण होतं. मात्र तिसऱ्या विकेटसाठी डेविड मिलर आणि शोएब मलिकने ४४ चेंडूत ५१ धावांची भागिदारी केली. मात्र त्यानंतर राशिद खानच्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडलं. संघाने सामन्यातील दहावं षटक त्याच्या हातात सोपवण्यात आलं. त्याने दुसऱ्या चेंडूवर मिलरला बाद केलं. मिलर २३ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला रोवमॅन पॉवेल खातही खोलू शकला नाही. राशिद खानच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. त्यानंतर चौदाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर शेरफेन रदरफोर्डला त्रिफळाचीत केलं. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर फॅबियन एलनला बाद केलं. सामन्यातील १६ वं षटक घेऊन पुन्हा राशिद खान उभा राहीला. त्याने या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रियाजला त्रिफचित केलं.


या विजयासह लाहोर कलंदर्स गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. लाहोर कलंदर्स ६ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर पेशावर जाल्मी गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.