Pakistan vs Australia ODI Series: पाकिस्तान संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ९ विकेट्सने मोठा पराभव केला. पाकिस्तानच्या या विजयासह त्यांनी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात पाकिस्तानकडून हारिस रौफ, सॅम अयुब आणि शाहीन आफ्रिदी यांनी चांगली कामगिरी केली. या खेळाडूंमुळेच पाकिस्तानी संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य दिले होते, जे अब्दुल्ला शफीक आणि सॅम अयुबच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने सहज पूर्ण केले. या विजयासह पाकिस्तानने भारताला मागे टाकलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा हा ४१वा विजय आहे. यासह पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियात ४० हून अधिक एकदिवसीय सामने जिंकणारा पहिला आशियाई संघ बनला आणि भारताचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने एकूण ४० एकदिवसीय सामने जिंकले आहेत. आता पाकिस्तानी संघ भारतीय संघाच्या पुढे गेला आहे. श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकूण २९ सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकणारे आशियाई संघ:
पाकिस्तान- ४१
भारत- ४०
श्रीलंका- २९
बांगलादेश- २
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
वेस्ट इंडिज – ७५
इंग्लंड – ५३
पाकिस्तान – ४१
भारत – ४०
न्यूझीलंड – ३८
हारिस रौफची भेदल गोलंदाजी अन् ५ विकेट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ८ षटकांत २९ धावा देत ५ विकेट घेतले. त्याने ऑस्ट्रेलियन बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त केली. त्याच्यासमोर असलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना क्रीझवर फार काळ थांबता आले नाही. त्याच्याशिवाय शाहीन आफ्रिदीने तीन विकेट घेतले. या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १६३ धावांवर गारद झाला. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ३५ धावा केल्या.