इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच संपन्न झाली. या मालिकेत पाकिस्तानला ऐतिहासिक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ६७ वर्षांनंतर एखाद्या संघाने घरच्या कसोटीत यजमान संघाचा क्लीन स्वीप केला. या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चेला उधाण आले आहे. रमीज राजाने कसोटी संघ निवडीबाबत दिलेल्या सल्ल्याला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ब्रेक लावला आहे.
कसोटी इतिहासात असे प्रथमच घडले आहे, जेव्हा पाकिस्तानचा त्यांच्याच घरात सुपडा साफ झाला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये वादळ आले आहे. या घटनेमुळे रमीज राजा यांना काल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा राजीनामा द्यावा लागला. खरं तर, इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील पराभवानंतर माजी पीसीबी अध्यक्षांनी एका निवेदनात सांगितले की, त्यांनी बाबर आझमला एक सल्ला दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी कसोटीसाठी टी२० खेळाडूंची निवड करण्यास सांगितले आहे. त्यांच्या मते पाकिस्तान संघाची इंग्लंडसारखी मानसिकता असणे आवश्यक आहे. इंग्लंडच्या नव्या रणनीतीचेही त्यांनी कौतुक केले. मात्र रमीज राजांच्या या सल्ल्याचा समाचार घेत बाबर आझम याने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते, “गोष्टी एकाच वेळी बदलता येत नाहीत.”
सर्व काही योजनेनुसार होते – बाबर आझम
रमीज राजांच्या सल्ल्याबाबत पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला, “दरवाजा कोणासाठीही बंद नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एक निश्चित योजना आहे आणि आम्ही क्रिकेटमधील प्रत्येक स्वरूपासाठी योजना करतो. तुम्ही एका रात्रीत, दिवसात किंवा आठवड्यात गोष्टी बदलू शकत नाही, त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. मानसिकता बदलायला वेळ लागतो.”
कर्णधार बाबरने नाराजी व्यक्त करत म्हणाला की, “जर आपण बचावात्मक खेळ करू लागलो तर पत्रकार विचारतील की आपण आक्रमक का खेळत नाही आणि जेव्हा आपण आक्रमक खेळतो तेव्हा ते विचारतात की आपण संयम दाखवून कसोटीसारखे का खेळत नाही. चला मनसोक्त खेळूया. नेहमी प्रश्न विचारले जातील, तुम्ही प्रत्येकाला संतुष्ट करू शकत नाही. शेवटी काय महत्वाचे आहे ते परिणाम आहे. निकाल न आल्यास, आम्ही काहीही केले तरी प्रश्न निर्माण होतीलचं.”
बाबर आझमच्या करण्धापदावर टांगती तलवार
बुधवारी (२१ डिसेंबर) माजी पाकिस्तानी क्रिकेटर रमीज राजाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. आता पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक हेही आपले पद सोडू शकतात. त्याचबरोबर बाबर आझमला कसोटी कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. पीसीबीच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, माजी ऑफस्पिनर सकलेन न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर पद सोडू शकतो.