Pakistan Team and Asia Cup 2023: हारिस रौफ आणि नसीम शाह यांना दुखापत झाली असून, भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यानही दोघेही संघर्ष करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते दोघे फलंदाजीलाही आले नाहीत. नसीम आणि हारिस आता आशिया चषकाचे उर्वरित सामने खेळणार नसल्याचे पीसीबीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. मात्र, अंतिम निर्णय त्यांनी घेतलेला नाही. पाकिस्तानला सध्या सुपर फोर फेरीत श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे आणि जर संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर ते दोन सामने खेळतील.
पीसीबीकडून मिळालेल्या वृत्तानुसार, १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हारिस आणि नसीमच्या खेळण्यावर शाशंक असून आगामी विश्वचषकासारखी स्पर्धा पाहता ते कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. मात्र, पाकिस्तानसाठी हा सामना आशिया चषकात टिकून राहण्यासाठी ‘करो या मरो’ अशा प्रकारचा असणार आहे. तो सामना जिंकूनच पाकिस्तान संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकेल. त्याचवेळी, जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर ते १७ सप्टेंबरला देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा लढत पाहायला मिळू शकते.
पीसीबीने मीडिया रिलीजमध्ये म्हटले आहे, “खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही दोघांनाही फलंदाजीसाठी पाठवले नाही. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या तंदुरुस्ती आणि काळजीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हारिस रौफ आणि नसीम शाह हे पाकिस्तानच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत.” येत्या काही दिवसांत दोघेही दुखापतीतून सावरले नाहीत तरच संघ व्यवस्थापन आशियाई क्रिकेट परिषदेकडून बदली खेळाडूची मागणी करेल.
भारत-पाकिस्तान सामन्यात काय घडले?
आशिया कपच्या सुपर-४ फेरीत भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेला सामना दोन दिवसांत संपला. रविवारी (१० सप्टेंबर) सामना सुरू झाला, मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. रविवारी खेळ थांबला तोपर्यंत भारताने २४.१ षटकांत २ बाद १४७ धावा केल्या होत्या. सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस होता. पुढे खेळताना भारतीय संघाने ५० षटकात ३५६ धावा केल्या.
कर्णधार रोहितने ४९ चेंडूत ५६ धावा, शुबमन गिलने ५२ चेंडूत ५८ धावा केल्या. दोघांनी सलामीच्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. यानंतर कोहली आणि राहुलने २३३ धावांची नाबाद भागीदारी केली. कोहली ९४ चेंडूत १२२ धावा करून नाबाद राहिला आणि राहुल १०६ चेंडूत १११ धावा करून नाबाद राहिला. कोहलीच्या वन डे कारकिर्दीतील हे ४७वे शतक होते.
प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ३२ षटकांत केवळ १२८ धावा करू शकला. नसीम शाह आणि हारिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. भारताकडून कुलदीप यादवने पाच विकेट्स घेतल्या. भारतीय संघ मंगळवारी (१२ सप्टेंबर) सुपर-४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना खेळत असून श्रीलंकेसमोर २१४ धावांचे आव्हान ठेवले आहे. सुपर-४ मध्ये भारताचे खाते उघडले आहे. त्याच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेचेही प्रत्येकी दोन गुण आहेत.