अबुधाबीमध्ये खेळल्या जात असलेल्या टी-१० लीगच्या सामन्यात पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांच्यासोबत गंभीर घटना घडली. मात्र, या घटनेत त्यांचे फारसे नुकसान झाले नाही. चेन्नई ब्रेव्ह्ज आणि नॉर्दर्न वॉरियर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये दार यांच्या डोक्यावर भरधाव वेगाने येणारा चेंडू आदळला.
या सामन्यात गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली, परंतु सर्वात भयानक क्षण म्हणजे दार यांना झालेली दुखापत ठरली. डोक्याला चेंडू लागल्यानंतर खेळाडूसह वैद्यकीय पथकाने मैदानात धाव घेतली. पहिल्या डावाच्या पाचव्या षटकात, क्षेत्ररक्षकाने चेंडू दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे देण्याच्या उद्देशाने चेंडू फेकला. मात्र, हा चेंडू दार यांच्या डोक्याला लागला.
५३ वर्षीय दार हे चेंडू आपल्याकडे येत असल्याचे पाहून पळत होते, पण त्यांना तो चुकवता आला नाही. उसळीमुळे चेंडूचा वेग मंदावला. नॉर्दर्न वॉरियर्सच्या फिजिओने त्यांची तपासणी केली.
हेही वाचा – IPL 2022 : रोहितच्या मुंबई इंडियन्समधून खेळणार दिल्लीचा ‘हा’ धाकड फलंदाज?; नुकतंच ठोकलंय दमदार शतक!
या सामन्यात केनर लुईस आणि मोईन अली या दोन्ही नॉर्दनच्या फलंदाजांनी ६ षटकांत १०६ धावांची भागीदारी केली. दोघांनी मिळून या भागीदारीत ८ षटकार ठोकले.. नॉर्दर्नने निर्धारित षटकात १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला केवळ १३३ धावा करता आल्या. केनर सामनावीर ठरला. या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला.