हिंदुवादी संघटनांनी आंदोलने केली तरी पाकिस्तान व भारत यांच्यातील आगामी क्रिकेट मालिका भारतात निर्विघ्नपणे पार पडेल, अशी आशा ज्येष्ठ क्रिकेटपटू वासिम अक्रम यांनी येथे व्यक्त केली. ही मालिका पुढील महिन्यात होणार आहे.
पाकिस्तानचा संघ डिसेंबर व जानेवारीमध्ये भारतात एक दिवसाचे पाच सामने व ट्वेन्टी२०चे दोन सामने खेळणार आहे. २००७ नंतर प्रथमच भारतात पाकिस्तानचा संघ मालिका खेळणार आहे. ही मालिका रद्द करावी अशी मागणी भारतामधील काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अक्रम म्हणाले, ही मालिका कोणतीही अडचण न येता पार पडेल अशी मला खात्री आहे, कारण आता पाकिस्तानविषयी भारतीयांमधील अढी दूर झाल्या आहेत. दोन्ही देशांमधील क्रिकेट चाहत्यांना अशा मालिका आयोजित केल्या जाव्यात असे वाटत आहे. भारतीय शासनाने या मालिकेबाबत आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही देशांमधील चाहत्यांप्रमाणेच साऱ्या जगातील क्रिकेट चाहते या दोन देशांमधील सामन्यांबाबत आतुरतेने वाट पाहात आहेत. यापूर्वीही अशा मालिकांच्या वेळी धमक्या आल्या होत्या, मात्र तरीही आम्ही तेथे सामने खेळलो आहोत. १९९९ मध्ये चेन्नई येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सामन्यांपूर्वी खेळपट्टीची नासधूस केली होती, मात्र ऐनवेळी आमचा सामना अन्य ठिकाणी घेण्यात आला.     

Story img Loader