PAK vs ENG Before World Cup 2023 Semi Final: कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या विश्वचषक 2023 सामन्यात इंग्लंडविरुद्ध अशक्यप्राय फरकाने विजय मिळवायचा असेल तर फखर जमान हा हुकुमी एक्का सिद्ध होऊ शकतो, अशी आशा पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने व्यक्त केली आहे. ९ सामन्यांत १० गुण मिळवलेला न्यूझीलंड १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध उपांत्य फेरीत खेळणार, हे ९९ टक्के निश्चितच आहे. पाकिस्तानची गमावलेली संधी आता फक्त नेट रन रेटवर अवलंबून आहे आणि नेट रन रेट सुधारण्यासाठी त्यांना गतविजेत्यांविरुद्ध अभूतपूर्व कामगिरी करावी लागणार आहे.
या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे आणि त्यांना किमान २८७ धावांनी विजयी होण्याची गरज आहे. त्यामुळे बाबर आणि कंपनीने ३०० धावा केल्या तर त्यांना इंग्लंडला केवळ १३ धावांवर बाद करावे लागेल. मात्र जर पाकिस्तानला आधी गोलंदाजी करावी लागली आणि पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडला अगदी १०० धावांत गुंडाळले तरीही त्यांना अवघ्या २.५ षटकात धावांचा पाठलाग पूर्ण करावा लागेल.
सामन्याच्या पूर्वसंध्येला बाबर म्हणाला की त्यांच्या मनात निश्चितपणे समीकरणे आहेत. “आम्ही फक्त मैदानात जाऊन अंदाधुंद फटके मारू शकत नाही. आम्हाला तेच करायचे आहे पण त्यासाठी नियोजित खेळ आवश्यक आहे. आम्हाला प्रत्येक षटक अशा प्रकारे खेळणं अपेक्षित आहे की आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकतो.”
बाबर पुढे म्हणाला की, “यामध्ये खेळाडूंची भागीदारी, कोणता खेळाडू किती काळ खेळपट्टीवर टिकेल? या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही मला विचाराल, तर मी म्हणेन की फखर २० किंवा ३० षटकांच्या दमदार खेळीवर हे साध्य करू शकतो. रिझवान, इफ्तिखार त्याला साथ देऊ शकतात. आम्ही हे करू शकतो आणि आम्ही यासाठी योजना आखली आहे. कसंय, आपण नेहमी आशावादी असायला हवं. कोणत्याही टप्यावर, कोणत्याही कामात तुम्ही सकारात्मक असायला हवे, माझा या आशेवर विश्वास आहे.”
दुसरीकडे, पाकिस्तानचे या विश्वचषकात काय चुकले याबाबत विचारले असता बाबर म्हणाला की, “कोणा एकाला दोष देणे योग्य नाही. तुम्ही असे म्हणू शकत नाही की ही गोलंदाजांची, क्षेत्ररक्षकांची किंवा फलंदाजांची चूक आहे. एक संघ म्हणून आम्ही नीट काम करू शकलो नाही. एक संघ म्हणून आम्ही अंमलबजावणी केली नाही. मागणीनुसार योजना करा किंवा खेळा – त्यात गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सगळ्याचं समीकरण जुळून येणे आवश्यक आहे.
हे ही वाचा<< “मी कोहलीशी जास्त बोलत नाही, तो आता..”, युवराज सिंगने ‘विराट’ व ‘चिकू’ मधील अंतर सांगत केला खुलासा
“आम्ही यातून शिकण्याचा प्रयत्न करू, कारण मोठ्या घटनांमधून तुम्ही जितक्या वेगाने शिकाल तितक्या लवकर तुमच्याकडून कुठे चुका झाल्या हे कळेल. मी पाहिले आहे की इथे त्रुटींचे प्रमाण खूप कमी आहे. कारण जेव्हा तुम्ही कोणत्याही संघाला थोडी जागा देता तेव्हा, ते तुमच्याकडून सामना हिरावून घेतात. ही विश्वचषकाची खासियत आहे. तुमचा प्रत्येक संघाविरुद्ध सामना असतो, आणि प्रत्येक सामना हाय व्होल्टेज असतो त्यामुळे माझ्या मते संपूर्ण संघाने चुकांमधून शिकायला हवे.”