PAK vs SA Coach Arther Says Babar Azam And Team Will Win: सलग तीन अपमानास्पद पराजित सामन्यांनंतर आज बाबर आझम व संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. विश्वचषकात केवळ एक पराभव गाठीशी असलेल्या अन्यथा विजयी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे आव्हान आझमच्या मेन इन ग्रीनसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. वर्ल्ड कपच्या पॉईंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तानची विश्वचषकातील मोहीम संपुष्टात येण्याची चिन्हे असताना पाक प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी मात्र संघाच्या कामगिरीवर जबरदस्त विश्वास दाखवला आहे. थोडी शिस्त आणि सराव असल्यास पाकिस्तानी संघ अजूनही विश्वचषक जिंकू शकतो असा सूर आर्थर यांच्या बोलण्यातून ऐकू येत आहे.
पाकिस्तानच्या विश्वचषक मोहिमेवर आतापर्यंत टीका होत असली तरी, संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी संघांच्या क्षमतेवर प्रकाश टाकत पूर्ण आत्मविश्वास व्यक्त केला आहे. आर्थर यांनी पाक विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या आधी पाकिस्तानच्या विजयाची खात्री वर्तवत म्हटले की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बाबर अँड कंपनी चांगला खेळ खेळेल. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आम्हाला सहा सामने मिळाले आहेत आणि आम्हाला सलग सहा सामने जिंकायचे आहेत. आम्हाला माहित आहे की एक युनिट म्हणून, एक संघ म्हणून, आमची रणनीती १००% तयार आहेच पण आम्हाला अंमलबजावणी सुद्धा १००% होईल याची खात्री करायची आहे, जर असे झाले तर पाकिस्तान विश्वचषक जिंकू शकणार नाही असे एकही कारण उरणार नाही.”
तर यापूर्वी सुद्धा आर्थर यांनी याआधी असेही म्हटले होती की, “पाकिस्तानी संघातील गोलंदाज जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड आमच्याही संघातील खेळाडू खेळू शकतात यात काहीच शंका नाही. आमच्याकडे क्रिकेट खेळण्याची ‘पाकिस्तानी पद्धत’ आहे. आम्ही त्या पद्धतीने खेळलो की परिणामही चांगले मिळतात, ती पद्धत आमच्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे आशा आहे की विश्वचषकात पद्धत पळून आम्ही विजयी होऊ.”
हे ही वाचा<< पाकिस्तान वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक देण्याची शक्यता! IND vs PAK साठी पॉईंट टेबलवर ‘हे’ गणित जुळायला हवं
दरम्यान आज नंतर पाकिस्तानचा पुढील सामना ३१ ऑक्टोबरला कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध सामना होईल. त्यानंतर पाकिस्तानचे लीग टप्प्यात आणखी दोन कठीण सामने आहेत. ४ नोव्हेंबर रोजी २०१९ च्या उपविजेत्या न्यूझीलंड आणि ११ नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानला आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे.