भारत व पाकिस्तान यांच्यातील सामने जणू काही एखाद्या युद्धासारखेच खेळले जातात. आतापर्यंत या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानचीच सरशी झाली असली तरी विश्वविजेत्या भारतीय संघाने या समीकरणात बदल घडवावा, अशीच अपेक्षा येथील क्रिकेट चाहते व्यक्त करीत आहेत. विशेषत: घरच्या मैदानावर तरी त्यांनी सामने गमावू नयेत, अशी त्यांची इच्छा आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात १९७८ मध्ये पहिल्यांदा एकदिवसाचा सामना झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकदिवसीय १२६ आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यापैकी पाच सामन्यांमध्ये एकही चेंडूचा खेळ झाला नाही. १२१ सामन्यांपैकी पाकिस्तानने ६९ वेळा विजय मिळविला आहे तर भारताने ४८ सामने जिंकले आहेत. चार सामने निकाली होऊ शकले नाहीत. पाकिस्तानने विजय मिळविलेल्या सामन्यांपैकी १४ सामने त्यांनी शारजा या ठिकाणी जिंकले आहेत. सहसा शारजामध्ये पाकिस्तान पराभूत होणार नाही याची काळजी घेतली जाते.
चेपॉकच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम पाकिस्तानने केला आहे. १९९७ मध्ये त्यांनी ५ बाद ३२७ धावा केल्या होत्या. त्यास उत्तर देताना भारताने २९२ धावा केल्या होत्या. ही या मैदानावरील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध १९९६मध्ये विजयासाठी २८६ धावांचे लक्ष्य साध्य करताना ४ बाद २८९ धावा करीत मैदानावरील तिसरी सर्वोच्च धावसंख्या नोंदविली होती. नीचांकी धावसंख्या नोंदविण्याची किमया भारतानेच केली आहे. इंग्लंडने त्यांना ८३ धावांमध्ये गुंडाळले होते.
पाकिस्तानच्या सईद अन्वर याने १९९७मध्ये या मैदानावर १९४ धावांचा पाऊस पाडला होता. हा सामना अर्थातच पाकिस्तानने जिंकला होता. चेन्नईत आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेचे सात आंतरराष्ट्रीय वन-डे सामने झाले आहेत. त्यापैकी पाच सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे. सामन्याच्या उत्तरार्धात फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाजांना गोलंदाजीस तोंड देणे कठीण जाते. कारण या स्टेडियमजवळ असलेल्या समुद्रामुळे हवेत सायंकाळी ओलसरपणा येतो व त्याचा फायदा वेगवान गोलंदाजांना होतो. हे मैदान अनेकांसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरले आहे.
सचिन तेंडुलकरने या मैदानावर पाच शतके ठोकली आहेत. कारकिर्दीतील पहिले शतक त्याने याच मैदानावर केले होते. राहुल द्रविडने कसोटी कारकिर्दीतील दहा हजार धावांचा टप्पा चेपॉकवरच ओलांडला होता. भारताचा फिरकी गोलंदाज नरेंद्र हिरवाणीने एकाच सामन्यात वेस्ट इंडिजचे १३६ धावांमध्ये १६ गडी बाद करीत सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा मान मिळविला होता.   

Story img Loader