करोनाचा फटका सर्व क्षेत्रांसोबत क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. लॉकडाउनच्या काळात क्रिकेटच्या अनेक महत्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या होत्या. पण करोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर नियमांचं पालन करत पुन्हा एकदा खेळाडू मैदानावर उतरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्येही सध्या बिह बॅश लीग खेळली जात असून अनेक मोठे खेळाडू याच्यात सहभागी आहेत. करोनाच्या सावटात सुरु असलेल्या स्पर्धेतील गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर मास्क घातल्याने सध्या चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफने विकेट घेतल्यानंतर मैदानातच लगेच हात सॅनिटाइज करत असल्याचं दाखवत मास्क घालत सेलिब्रेशन केलं. यामधून त्याने लोकांना करोनाला रोखण्यासाठी पूर्ण काळजी घेण्याचं आवाहन केल्याचं बोललं जात आहे. मैदानात अशा प्रकारचं सेलिब्रेशन आणि त्यातून संदेश दिला जात असल्याचं पहिल्यांदाच पहायला मिळालं आहे.
पाकिस्तानचा हारिस रौफ गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. बिग बॅश लीगमध्ये तो मेलबर्न स्टार्सकडून खेळत आहे. मेलबर्न स्टार्सच्या अनेक खेळाडूंना करोनाची लागण झाली होती.
हारिस रौफ सध्या चर्चेत आहे कारण काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने हारिस रौफला एक भेट पाठवली होता. हारिसला धोनीची स्वाक्षरी असणारी चेन्नई सुपरकिंग्जची जर्सी मिळाली होती. ट्वीटरवरन त्याने ही माहिती दिली होती.
ऑस्ट्रेलियामध्येही करोनाने कहर केला असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या परिस्थितीतही त्यांनी क्रिकेट सामने भरवले आहेत. एकीकडे बिग बॅश लीग सुरु असताना दुसरीकडे अॅशेसही सुरु आहे. तर याच आठवड्यात ऑस्ट्रेयिलन ओपनलाही सुरुवात होणार आहे.