उद्या तीन जानेवारी रोजी भारताचा ऑस्ट्रेलियावरोधातला चौथा व शेवटचा कसोटी सामना रंगणार असून विराट कोहलीला चक्क दोन पाकिस्तानी गोलंदाजांनी सराव दिला. कोहलीनं या दौऱ्यात २५९ धावा केल्या असून दुसऱ्या कसोटीत पर्थवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानं १२३ धावांची खेळी केली. गेल्या मोसमात त्यानं ११ आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली असून यंदाही तो हा विक्रम करण्यास उत्सुक असेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीसाठी विराट सज्ज होत असून त्याला फलंदाजी करण्यासाठी नेट्समध्ये सलमान इर्शाद व हारीस राऊफ या दोघा गोलंदाजांनी साथ दिली.

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा एकमेव भारतीय कप्तान असा विक्रम करण्याची संधी विराट कोहलीसमोर असून या संधीचं सोनं होतं का हे लवकरच कळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताला ऑस्ट्रेलियात एक कसोटी जिंकणही अवघड झालं होतं. २०११-१२ मध्ये भारतानं ४-० असा पराभव स्वीकारला होता. २०१४ मध्ये विराटनं चार शतकं झळकावली परंतु भारताला मालिका विजय काही साधता आला नव्हता.

शेवटच्या सामन्याआधी तयारी करताना कोहलीचे सलमान इर्शाद व हारीस राऊफबरोबरचे फोटो झळकत आहेत. चौधरी हमझानं तर या प्रॅक्टिसचा व्हिडीयो ट्विट केला आहे. लाहोर कलंदरचे हे खेळाडू असून त्यांचा पाकिस्तान सुपर लीगमध्ये समावेश झाला आहे. गेले काही महिने ते ऑस्ट्रेलियामध्ये सराव करत आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ऑस्ट्रेलियातल्या एका क्लबमध्ये खेळायची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे अद्याप कोहली पाकिस्तानबरोबर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. मात्र, मोहम्मद आमीर हा जगातला सगळ्यात उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक असल्याचं मत कोहलीनं व्यक्त केलं होतं. विराटनं आमिरला एक बॅटही भेट म्हणून दिली होती.

Story img Loader