IND vs PAK Champions Trophy 2025 : भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने त्याच्या लौकिकाला साजेशी शतकी (१११ चेंडूंत नाबाद १०० धावा) खेळी केल्याने भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी (२३ मार्च) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहा गडी राखून मात केली. सलग दुसऱ्या विजयासह भारताने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केलं असून पाकिस्तानचा संघ साखळी स्पर्धेतच गारद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, या सामन्यावेळी पाकिस्तानमधील काही क्रिकेट चाहते भारतीय संघाचं समर्थन करताना दिसले. अशा हाय व्होल्टेज सामन्यात दोन्ही संघांवर चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं असतं. अनेक खेळाडू चाहत्यांच्या दबावाखाली दिसतात. मात्र, पाकिस्तानमधील काही चाहत्यांनी आपल्या संघाऐवजी थेट प्रतिस्पर्धी संघालाच पाठिंबा दिल्याने कर्णधार मोहम्मद रिझवानच्या संघाचं एक प्रकारे खच्चीकरण झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, भारतीय संघाला पाठिंबा देणाऱ्या एका चाहत्याशी एएनआयने बातचीत केली. यावेळी त्याने सांगितलं की “आमचा संघ भारतीय संघाच्या बरोबरीचा नाही. त्यामुळेच आम्ही भारतीय संघाला पाठिंबा देत आहोत”. हा पाकिस्तानी चाहता भारताची जर्सी परिधान करून आला होता. तो म्हणाला, “आमच्या संघातील खेळाडूंकडे ना फिटनेस आहे, ना त्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे. म्हणूनच आम्ही भारतीय संघाला पाठिंबा देत आहोत. कारण भारतीय संघातील खेळाडूंकडे जे कौशल्य आहे त्याची आम्ही बरोबरी करू शकत नाही. आमचा संघ त्यांना पराभूत करू शकत नाही. आमचा संघ दुबळा आहे. आम्हाला खात्री होती की विराट कोहली जो वर्षभरापासून फॉर्मशी झगडतोय तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे फॉर्ममध्ये परत येईल आणि शतक देखील ठोकेल. नेमकं तसंच झालं.

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या बहुचर्चित सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला २४१ धावांत रोखल्यानंतर भारताने ४२.३ षटकांत ४ गड्यांच्या बदल्यात २४४ धावा करत विजय साकारला. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (१५ चेंडूंत २०) व सलामीच्या सामन्यातील शतकवीर शुभमन गिल (५२ चेंडूंत ४६) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहित व गिल माघारी परतल्यावर विराटने श्रेयस अय्यरच्या (६७ चेंडूंत ५६) साथीने भारताचा डाव सावरला. त्यांनी सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ११४ धावांची निर्णायक भागीदारी रचत भारताला विजयासमीप नेले. श्रेयस बाद झाल्यानंतर कोहलीने औपचारिकता पूर्ण करताना भारताला विजय मिळवून दिला, शिवाय एकदिवसीय कारकीर्दीतील ५१वे शतकही झळकावले.