Rashid Latif slam Wasim Akram And Waqar Younis : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानी संघाला दोन लाजिरवाण्या पराभवांना सामोरे जावे लागले. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्या क्रिकेट संघावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधीनच पाकिस्तानी संघ स्पर्धेबाहेर पडला आहे. यानंतर मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील संघाला दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी कठोर शब्दात सुनावले होते. दरम्यान यावरून आता पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार रशीद लतीफ यांने दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंवर हल्लाबोल केला आहे.
रशीद यांनी मागील पिढीतील क्रिकेटपटूंना, विशेषतः ९० च्या दशकातील खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेटपासून दूर राहण्याचा इशारा दिल्यानंतर पुन्हा एकदा याबद्दल विधान केले आहे. जिओ न्यूजवरील ‘हारना मना है’ या कार्यक्रमात बोलताना राशीद म्हणाले की, ९०च्या दशकातील क्रिकेटपटूंनी पाकिस्तान क्रिकेटला मोकळे सोडले नाही, म्हणून १७ वर्ष (पाकिस्तानला पुन्हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी) लागली. ९० च्या दशकातील खेळाडूंना व्यवस्थापन आणि संघापासूनही दूर ठेवा, त्यानंतरच ते जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. ते दीर्घ काळापासून पाकिस्तान क्रिकेटसाठी काम करत आले आहेत. त्यामुळे मला वाटते त्यांनी आता आराम केला पाहिजे.
‘कॉट बिहाइंड’ या युट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात त्यांनी या विधानाची पुनरावृत्ती केली, यावेळी मात्र त्यांनी वसीम अक्रम आणि वकार युनूस या माजी क्रिकेटपटूंवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी या दोघांचा उल्लेख ‘दुबई के लौंडे (दुबईची पोरं)’ असा केला. कारण हे दोघे माजी क्रिकेटपटू चॅम्पियन्स ट्रॉफीनिमीत्ताने सध्या यूएई येथे आहेत.
“दुबईतील पोरांनी गोंधळ घालून ठेवला आहे. दोघे एकमेकांची स्तुति करून खूष होत आहेत. आयुष्यभर भांडत राहिले, आम्हाला आगीत लोटलं… कमाल लोक आहेत. यांच्यासमोर पैसे फेका, हे काहीही करायला तयार होतील,” असेही राशीद म्हणाले.
महिन्याअखेर पाकिस्तानी संघ पुन्हा मैदानात
यजमान पाकिस्तानी संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून लवकरच बाहेर पडला आहे. त्यानंतर पाकिस्तानी संघ या महिन्याच्या अखेरीस पुन्हा मैदानात खेळताना दिसेल. १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरोधातील या दौऱ्यात पाच टी-२० सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यात येणार आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यासाठी मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमला वगळले आहे. टी-२० संघामध्ये सलमान आघाला नवा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे, तर शादाब खान उपकर्णधार असणार आहे. एकदिवसीय संघात शाहीन आफ्रिदीला वगळण्यात आले असून उर्वरित संघ तसाच ठेवण्यात आला आहे. वनडेसाठी कर्णधार, उपकर्णधार रिझवान आणि बाबर हेच असणार आहेत.