पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं आहे. शोएब मलिकने त्याच्या X अकाऊंटवरुन लग्नाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे सानिया मिर्झाला घटस्फोट न देताच या दोघांचा निकाह झाला का? सानिया आणि शोएबचं नातं संपुष्टात आलं का? असे प्रश्न लोक या पोस्टच्या उत्तरात विचारत आहेत. सना जावेद आणि शोएब मलिक यांच्या विवाहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएबने स्वतःच पोस्ट करत दिली माहिती

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दुसऱ्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली आहे. सना जावेद यांच्याशी विवाहबद्ध झाल्याचं शोएबने म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यात बेबनाव असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. सानिया मिर्झाने तिच्या अकाऊंटवरून शोएबबरोबरचे फोटो डिलिट केले होते. त्यावरून जोरदार चर्चा झाली होती. या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत शोएब मलिकने साना जावेद यांच्याशी विवाह झाल्याचं म्हटलं आहे.

सानियाशी शोएबचं दुसरं लग्न झालं होतं

४१ वर्षीय शोएब आणि सानिया मिर्झाचं २०१० साली लग्न झालं होतं. हे शोएबचं दुसरं लग्न होतं. त्याआधी शोएब आणि आयेशा सिद्दीकी यांचा घटस्फोट झाला होता. सानिया आणि सोहराब मिर्झा यांचा साखरपुडा झाला पण लग्न झालं नव्हतं. पाकिस्तानच्या खेळाडूशी लग्न करण्यावरून सानिया मिर्झाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. लग्नानंतर सानिया-शोएब दुबईत राहत होते. ४१वर्षीय शोएब हा पाकिस्तानचा माजी कर्णधार असून ३५ कसोटी, २८७ एकदिवसीय आणि १२४ ट्वेन्टी२० सामन्यात त्याने पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. जगभरात विविध ट्वेन्टी२० लीगमध्ये दहाहून अधिक संघांसाठी तो नियमित खेळतो.

१७ जानेवारीच्या दिवशी सानिया मिर्झाने काय पोस्ट केली होती?

सानिया पोस्टमध्ये म्हणते.. ‘लग्न असो किंवा घटस्फोट दोन्ही कठीणच, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. जाड राहणं कठीण आहे आणि फिट राहणंही कठीण, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. कर्जात बुडणं कठीण आहे, आर्थिक शिस्त लावणंही कठीण आहे. तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. बोलणं कठीण आहे आणि मौन बाळगणंही कठीण. तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. आयुष्य कधीही सोपं नसतं ते कठीणच असतं. आपण ते आपल्या मेहनीतने निवडतो. त्यामुळे विचार करा आणि मग निवड करा.’ या आशयाची एक पोस्ट सानिया मिर्झाने लिहिली होती. तिच्या पोस्टचा अर्थ आता सगळ्यांना उलगडला आहे.

 भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात ऑल इज नॉट वेल असल्याच्या बातम्या गेल्या दोन ते तीन वर्षांपासून समोर येत आहेत. मात्र पहिल्यांदाच सानिया मिर्झाने एक पोस्ट लिहित तिच्या आयुष्यावर भाष्य केलं होतं. आता शोएब मलिकने निकाहचे फोटो पोस्ट केल्यामुळे सगळाच उलगडा झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani cricketer shoaib malik ties the knot with pakistani actress sana javed scj