टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाल्यापासून पाकिस्तानी चाहते भारतीय संघाला ट्रोल करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सुरु असणारं हे ट्रोलिंग भारताने शेवटच्या तीन सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतरही सुरुच आहे. अर्थात हे ट्रोलिंग केवळ चांगल्या पद्धतीने केलं जात नसून काही वेळेस मर्यादा सोडूनही मस्करीच्या नावाखाली खिल्ली उडवली जात आहे. हे प्रकरण इतकं वाढलं आहे की पाकिस्तानी खेळाडू हे भारतीय खेळाडूंपेक्षा उत्तम आहेत हे दाखवण्यासाठी खोटे दाखलेही पाकिस्तानी चाहते देत आहेत. असाच एक प्रकार नुकताच समोर आला जेव्हा प्रसिद्ध समाचोलक हर्षा भोगले यांनी त्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या एका अशाच खोट्या वक्तव्यावर तो मी नव्हेच पद्धतीचा रिप्लाय केला.
नक्की वाचा >> …अन् सारा संघ विजयाचा जल्लोष करताना सामना जिंकवून देणारे मात्र खुर्च्यांवरुन हललेही नाहीत; फोटो होतोय व्हायरल
हर्षा भोगले यांच्या नावाने काही पाकिस्तानी चाहत्यांनी एक वक्तव्य व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गोष्ट लक्षात येताच हर्षा यांनी ते व्हायरल ट्विटवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानी चाहत्यांकडून केल्या जाणाऱ्या या बढाईमधील हवाच काढून टाकली. झालं असं की एका पाकिस्तानी चाहत्याने एक वाक्य हर्षा भोगले बोलल्याचं ट्विट केलं. या वाक्यामधून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा चाहत्याचा प्रयत्न होता.
या व्हायरल ट्विटनुसार, “बाबर आझमच्या नेतृत्वामुळे पाकिस्तानी संघाला मिसाबच्या वेळी मिळालेलं तसं स्थैर्य मिळालं आहे, सध्या तो (बाबर आझम) हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. तसेच जागतिक स्तरावर केवळ शाहीनशीच त्याची तुलना होऊ शकते. तो एकदम उत्तम कामगिरी करत आहे,” असं हर्षा म्हणाल्याचा दावा करण्यात आलेला.
नक्की वाचा >> २०१७ मध्येच क्रिकेट सोडण्याच्या विचारात असणारा खेळाडूच आज न्यूझीलंडला T20 World Cup फायनलमध्ये घेऊन गेला
मात्र हर्षा यांनी जेव्हा हे ट्विट पाहिलं तेव्हा त्यांनी त्यावर रिप्लाय देत आपण असं कधी म्हणालोच नव्हतं असं रोकठोकपणे सांगून टाकलं. “त्याला (बाबरला) फलंदाजी करताना पाहून आनंद होतो, मात्र मी त्याच्याबद्दल असं कधी बोललो नाही. मी फक्त असं म्हटलं होतं की तो त्यांचा (पाकिस्तानचा) सर्वोत्तम फलंदाज आहे. तेही तो त्याच्या संघासाठी करत असणारी कामगिरी पाहून म्हटलेलं. मला वाटतं तो सध्या तीन ते चार सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. अर्थात या सर्वोत्तम खेळाडूंपैकी असणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे,” असं हर्षा यांनी रिप्लायमध्ये म्हटलं आहे. हर्षा यांच्या या रिप्लायला आठ हजारहून अधिक जणांनी लाईक केलं आहे.
हर्षा भोगले यांनी अशाप्रकारे थेट ट्विटरवरुन वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. हर्षा हे अनेकदा त्यांची मतं उघडपणे आणि रोकठोक पद्धतीने मांडत असतात. तशाच प्रकारे त्यांनी यावेळेस आपल्या नावाचा वापर करुन काही खोटी माहिती पसरवली जाऊ नये यासाठी ट्विटरवरुन अगदी सरळ भाषेत रिप्लाय केल्याचं पहायला मिळालं.