संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) केंद्र सरकारने सोमवारी लागू केला. त्यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी महिनाभराचा कालावधी उरला असताना केंद्राने हा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये ‘सीएए’विरोधात देशभर हिंसक आंदोलने झाली होती. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
काय म्हटलंय दानिश कनेरियाने?
“पाकिस्तानातले हिंदू आता मोकळा श्वास घेऊ शकतील. सीएए लागू केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार” अशी पोस्ट दानिश कनेरिया यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.
दानिश कनेरिया यांनी पाकिस्तान क्रिकेटवर अनेकदा भेदभावाचा आरोप केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाकिस्तानी स्पिनर कनेरिया यांनी शाहिद आफ्रिदीवर भेदभावाचा आरोप केला आहे. मी हिंदू असल्याने माझ्याशी भेदभाव केला गेला असं सांगण्यात आलं. कनेरिया यांनी पाकिस्तानसाठी ६१ कसोटी सामने आणि १८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. २०१९ मध्ये कनेरियांवर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता. मात्र पोलिसांनी त्यांना क्लिन चिट दिली.
भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात ‘सीएए’चे आश्वासन दिले होते. त्यानुसार, २०२४ च्या निवडणुकीआधी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभर ‘सीएए’ लागू केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. सीएएमुळे देशातील मुस्लिमांना लक्ष्य केले जाण्याचा धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करत विविध राज्यांमध्ये या कायद्याला तीव्र विरोध झाला होता. देशभर हिंसक विरोध होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली होती. संसदेने डिसेंबर २०१९ मध्ये हा कायदा संमत केला असतानाही नियम बनवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे सांगत कायद्याची अंमलबजावणी लांबविण्यात आली होती. निवडणुकीच्या तोंडावर कायदा लागू केल्यामुळे भाजपच्या हाती राजकीय आयुध मिळाल्याचे मानले जात आहे.