पाटणा पायरेट्सकडून खेळणारा पाकिस्तानी खेळाडू वासिम सज्जडला प्रो-कबड्डीच्या संयोजकांनी मंगळवारी मैदानाच्या सीमारेषेबाहेर राखीव खेळाडू म्हणूनच ठेवणे पसंत केले. नेमकी हीच रणनीती सोमवारी तेलुगू टायटन्सच्या संघाने अतिफ वाडेद आणि वाजिद अली यांच्याबाबतीत अमलात आणली होती. मुंबईचा टप्पा सुरळीतपणे पार पडता यावा, यासाठीच त्यांना मैदानाबाहेर सुरक्षित ठेवण्याची चर्चा आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र मंगळवारी सकाळीच पाकिस्तानचे तीन खेळाडू आणि एका अधिकाऱ्याचे मुंबईत आगमन झाल्याचे भारतीय हौशी कबड्डी महासंघातर्फे सांगण्यात आले.
मागील आठवडय़ात गुरुवारीच पाकिस्तानचे तीन खेळाडू आणि एका अधिकाऱ्याला व्हिसा मंजूर झाला होता. या वेळी जयपूर पिंक पँथर्सचा खेळाडू नासीर अली आणि आशियाई कबड्डी महासंघाचे सचिव मोहम्मद सरवार या दोघांचा व्हिसा भारतीय उच्चायुक्तालयाकडून नाकारण्यात आला होता. परंतु पाकिस्तानचे चौघे जण भारतात आधीच आल्याचे म्हटले जात आहे.
मंगळवारी झालेल्या यू मुंबाविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी वसिम सज्जड संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये नाव व क्रमांकाचा उल्लेख नसलेली जर्सी परिधान करून हजर होता. अगदी दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या यादीतसुद्धा त्याचे राखीव खेळाडू म्हणून नाव होते. परंतु त्याला प्रत्यक्षात खेळवण्याचे मात्र संयोजकांनी टाळले.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘हा विषय संवेदनशील आहे. आम्हाला प्रो-कबड्डी लीगची चांगली सुरुवात व्हावी असा आमचा हेतू होता.’’ परंतु भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज चतुर्वेदी यांनी सांगितले की, ‘‘पाकिस्तानी खेळाडू भारतात आले आहेत. वाघामार्गे ते भारतात आल्यानंतर सकाळी ते मुंबईत दाखल झाले आहेत. कोलकात्यामध्ये ते आपापल्या संघाकडून खेळू शकतील. आज सकाळीच आल्यामुळे थेट संघात खेळवणे योग्य ठरणार नाही.’’ सामन्यानंतर संयोजकांनी वसिमला कोणाच्याही हाती लागू न देता अतिशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कर्णधार सोडून संघातील कोणताही खेळाडू प्रसारमाध्यमांशी बोलणार नाही, असे संघ व्यवस्थापनानने सांगितले असल्याचे कळवले असल्याचे प्रशिक्षकांनी यावेळी सांगितले.

Story img Loader