सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-द राइज‘ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक क्रिकेटपटूंनी या चित्रपटातील डॉयलाग आणि गाण्यावर व्हिडिओ बनवले आहेत. भारतीय प्रेक्षकांनीही क्रिकेटपटूंच्या प्रयत्नांना चांगलीच पसंती दिली. देश-विदेशातील खेळाडूंशिवाय आता या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या प्रसिद्ध गाण्याची हुक स्टेप पाकिस्तानात पोहोचली आहे. अफगाणिस्तान संघाचा दिग्गज फिरकीपटू राशिद खानने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफसोबत ‘श्रीवल्ली’ गाण्यावर ठेका धरला.
याआधी राशिदने पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणत एक व्हिडिओ शेअर केला होता. आता त्याने हारिस रौफसोबत ‘श्रीवल्ली’ गाण्यावर हुक स्टेप केली आहे. अल्लू अर्जुननेही त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत टाळ्यांचा इमोजी शेअर केला आहे.
हेही वाचा – दुसरा कपिल देव शोधणं बंद करा..! गंभीरचा टीम इंडियाला सल्ला; वाचा काय म्हणाला गौतम?
सुरेश रैना, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर आणि वेस्ट इंडीजचा ड्वेन ब्राव्हो यांनी ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स केला होता. याशिवाय बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही या गाण्याची हुक स्टेप पाहायला मिळाली आहे. ड्वेन ब्राव्हो, नजमुल इस्लाम आणि शाकिब अल हसन यांच्यावरही श्रीवल्ली गाण्याचा प्रभाव पाहायला मिळाला.
अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना मुख्य भुमिकेत असणाऱ्या ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि त्यामुळेच या चित्रपटाची भुरळ सर्वत्र दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटी रूपयांची कमाई केली. या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.