यूएईमध्ये सध्या आशिया चषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. सध्या सुपर-४ फेरीतील सामने सुरू असून ११ सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात पाकिस्तानने भारतावार पाच गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात मोहम्मद रिझवानने धमाकेदार फलंदाजी करून पाकिस्तानला घेऊन जाण्याचा पराक्रम केला. मात्र पाकिस्तानचा हाच शिलेदार आता जायबंदी झाला आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो आगामी सामना खेळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच कारणामुळे आता पाकिस्तानी संघ अडचणीत आला आहे.
हेही वाचा >>> IND vs PAK : पाकिस्तानच्या मुलींमध्ये कोहलीची क्रेझ, भारत-पाक सामन्यातील ‘या’ खास फोटोची होतेय चर्चा
भारत-पाकिस्तान सामन्यात १८२ धावांचे लक्ष्य गाठताना मोहम्मद रिझवानने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने अवघ्या ५१ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ६ चौकार लगावत ७१ धावा केल्या. सलामीला आल्यापासून पहिल्या षटकापासूनच त्याने मोठे फटके मारण्यास सुरुवात केली होती. याच कारणामुळे त्याने ७१ धावा केल्या. विशेष म्हणजे रिझवानमुळेच पाकिस्तानला विजय सोपा झाला. रिझवानने यष्टीरक्षक म्हणूनही चांगली कामगिरी केली. मात्र भारताच्या १३५ धावा झालेल्या असताना चेंडू पकडताना त्याने उंच झेप घेत चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी खाली येताना त्याच्या एका पायावर सर्व वजन पडले आणि त्याला दुखापत झाली. मोहम्मद रिझवान जायबंदी झाल्यामुळे साधारण पाच मिनिटांसाठी सामना थांबला होता.
हेही वाचा >>> INV vs PAK Virat Kohli : ‘…वाटले आता करिअर संपले’ विराट कोहलीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, म्हणाला “रात्रभर…”
पाकिस्तानी संघाने भारताविरोधीताल सामन्यात विजय मिळवला. मात्र त्यांची पुढील लढत श्रीलंका आणि अफगाणिस्तानसोबत होणार आहे. या लढतीत पाकिस्तानला चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. एकीकडे विजयाचे आव्हान असताना दुसरीकडे त्यांचा मोहम्मद रिझवान हा आघाडीचा फलंदाज जायबंदी झालेला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याच्यावर एमआरआय तसेच इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. याच कारणामुळे आगामी दोन सामन्यात तो खेळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.