प्रो-कबड्डी लीगच्या लिलावामध्ये बोली लागलेले सर्वाधिक सहा खेळाडू इराणचे होते. याचप्रमाणे दक्षिण कोरिया आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी चार खेळाडूंवर बोली लागली. सध्या सुरू असलेल्या आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत एकही पाकिस्तानी खेळाडू खेळत नाही. परंतु प्रो-कबड्डी लीगमध्ये चार पाकिस्तानी खेळाडू खेळणार आहेत. मंगळवारी झालेल्या लिलावामध्ये पाटणा फ्रेंचायझीने वासिम सज्जडला सर्वाधिक ५ लाख २० हजार रुपये भाव दिला. तसेच अतिफ वहीद आणि वाजिद अली यांना तेलुगू टायटन्स संघाने प्रत्येकी चार लाखांना खरेदी केले. याचप्रमाणे नासिर अलीला जयपूर पिंक पँथर्सने चार लाखांची बोली लावून संघात स्थान दिले.
पाकिस्तानी खेळाडूंना प्रो-कबड्डी स्पध्रेत खेळता येईल का, या प्रश्नाला उत्तर देताना मशाल स्पोट्सचे संचालक चारू शर्मा म्हणाले, ‘‘भारतीय हौशी कबड्डी महासंघाने या दृष्टीने गांभीर्याने पावले उचलली आहेत. या खेळाडूंना प्रो-कबड्डी स्पध्रेत खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आम्ही आमच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न करू.’’
आंतरराष्ट्रीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांनी सांगितले की, ‘‘पंजाबमध्ये नुकतीच आंतरराष्ट्रीय सर्कल कबड्डी स्पर्धा झाली. या स्पध्रेत पाकिस्तानचा संघ सहभागी झाला होता. क्रीडा मंत्रालय आणि गृहमंत्रालयाकडे खेळाडूंच्या व्हिसासंदर्भात आमची बोलणी सुरू आहेत. आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.’’
ते पुढे म्हणाले की, ‘‘आम्हाला प्रो-कबड्डीच्या आयोजनात राजकीय अडचणी कोणत्याही येणार नाहीत. सध्या देशात आलेले महायुतीच्या सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना आहे. महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार हे कुशल कबड्डी संघटक कार्यरत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी शिवशाही चषक कबड्डी स्पध्रेची बिजे रोवली. या राज्यातील आमदार-खासदार आदी मंडळींचेही कबड्डीवर जीवापाड प्रेम आहे. कारण खेळ वाढवण्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे.’’
प्रो-कबड्डीची खासियत
’प्रो-कबड्डीसाठी एकूण एक कोटी रुपये पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. या स्पध्रेतील विजेत्या संघाला ५० लाखांचे बक्षीस मिळेल.
’या लीगसाठी खास मॅट तयार करण्यात आले असून, स्पर्धा संपल्यानंतर हे मॅट स्थानिक असोसिएशन्सला भेट द्यावे असे सुचवण्यात आले आहे. मैदानापेक्षा मॅटच्या कबड्डीचा प्रसार व्हावा यासाठी ते आवश्यक आहे.
’प्राइम टाइमला प्रो-कबड्डीचे प्रक्षेपण होणार असून, खेळातील मनोरंजकता जपण्यासाठी त्याच्या नियमांमध्ये माफक बदल करण्यात आले आहेत.
’यशस्वी चढाई किंवा पकडीचा थरार संपतो न संपतो तोच पुढील क्रिया या खेळात सुरू होते, इतका हा खेळ वेगवान आहे. परंतु या रिप्लेंचा आनंद लुटून मग पुढे जाता येईल या दृष्टीने छोटे-छोटे टाइम आऊट सामन्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
काश्याची हनुमानउडी दहा लाखांची!
मुंबई : कबड्डीच्या मैदानावर प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षकांच्या चक्रव्यूहातून निसटण्यासाठी वापरली जाणारी हनुमानउडी ही काशिलिंग आडकेची खासियत. ‘काश्या’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या सांगलीतील आडकेने सर्वाधिक दहा लाख रुपयांची बोली जिंकली आहे. तो या स्पध्रेत दिल्ली संघाकडून खेळणार आहे. त्यापाठोपाठ उपनगरचा नीलेश शिंदे आणि सांगलीचा नितीन मदने यांना अनुक्रमे ९.६० लाख आणि ९.२० लाख रुपये किंमतीला बंगाल वॉरियर्सने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे.
‘अ’ गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या सहा खेळाडूंना विविध संघांमधून संधी मिळाली आहे. याचप्रमाणे ‘ब’ गटातून महाराष्ट्राच्या खेळाडूंना विविध संघांमध्ये स्थान मिळाले आहे. या बाजी मारली आहे ती मुंबईच्या रिशांक देवाडिगाने. ५ लाख २० हजार रुपये रकमेला यु मुम्बा संघाने त्याला खरेदी केले आहे. याशिवाय विशाल माने या मुंबईच्या आणखी एका खेळाडूला वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे.