भारतात पुलवामा येथे काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला. त्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी संतापाची लाट उसळली आहे. मोदी सरकारने पाकिस्तानच्या या हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी जनसामान्यांमधून होत आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले आहे. पण या दरम्यान भारतात होणाऱ्या नेमबाजी विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना प्रवेश देण्यात आला आहे.

येत्या ICC World Cup २०१९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियोजित असलेला सामना भारताने खेळू नये, असे अनेकांचे मत पडत आहे. मात्र या दरम्यान पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा देण्यात आला असून या खेळाडूंना केंद्रीय गृह खात्याने मंजूरी दिली आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे सचिव राजीव भाटिया यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय गृह खात्याने पाकिस्तानी खेळाडूंचा व्हिसा मंजूर केला आहे आणि तो उच्चायुक्तांकडे इस्लामाबाद येथे पुढील बाबींसाठी पाठवण्यात आला आहे, असे भाटिया म्हणाले. ‘केंद्रीय गृह खात्याने त्यांचा व्हिसा मंजूर केला आहे. तो आता उच्चायुक्तांकडे व इस्लामाबाद येथे पाठवण्यात आला आहे. भारतीय उच्चायुक्तांनी माझ्याशी संपर्क केला आणि खेळाडूंची नावे विचारून घेतली. त्यामुळे २ खेळाडू आणि १ प्रशिक्षक यांचा व्हिसा नक्की मंजूर होईल अशी अपेक्षा आहे’, असे भाटिया म्हणाले.

दरम्यान, सोमवार संध्याकाळपर्यंत व्हिसा मंजूर न झाल्यास आम्ही आमचे खेळाडू या स्पर्धेसाठी पाठवणार नाही, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. २० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्ली येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी १६ खेळाडू पात्र ठरणार आहेत.

Story img Loader