भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन हा त्याच्या रांगड्या सेलिब्रेशनसाठीही ओळखला जातो. एखादा झेल पकडल्यानंतर किंवा शतक साजरं करताना धवन आपल्या मांड्या थोपटून सेलिब्रेशन करतो. कब्बडीच्या खेळामध्ये असं सेलिब्रेशन फार सामान्य गोष्ट आहे. मात्र क्रिकेटमध्ये हे असं सेलिब्रेशन शिखर धवन स्टाइल सेलिब्रेशन म्हणून ओळखलं जातं. मात्र एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला अशाप्रकारे सेलिब्रेशन करणं महागात पडलं आहे. यासाठी या खेळाडूवर एकदा नाही तर दोनदा कारवाई झालीय.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरगुती कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या १६ सदस्यीय संघाचा भाग असणारा फिरकीपटू साजिद खानने नुकताच यासंदर्भातील खुलासा केलाय. साजिद हा धवनची स्टाइल कॉपी करतो असा आरोप केला जातो त्यावरही त्याने स्पष्टीकरण दिलंय.
मागील वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा साजिद आतापर्यंत पाकिस्तानसाठी चार कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने आठ गडी बाद केलेत. मागील वर्षी त्याने मीरपूर कसोटीमध्ये बंगलादेशविरोधातील सामन्यामध्ये दोन्ही डावांत एकूण १२ गडी तंबूत पाठवले होते. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतकाचीही नोंद आहे. मात्र बळी घेतल्यानंतर साजिदचं सेलिब्रेशन हे शिखर धवनकडून कॉपी करण्यात आल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगताना दिसते. याचवर त्याने स्पष्टीकरण दिलंय.
नक्की पाहा >> Video: …अन् सूर्यकुमार यादवने मैदानामधूनच द्रविड सरांना केला ‘स्टायलिश नमस्ते’
सजिदने दिलेल्या माहितीनुसार शिखर धवन स्टाइल सेलिब्रेशन नावाने लोकप्रिय असणारी मांडीवर थाप मारुन सेलिब्रेशनची पद्धत त्याला दोनवेळा महागात पडलेली. असं सेलिब्रेशन केल्यामुळे साजिदला दोनदा दंड ठोठावण्यात आलेला. धवन हा मागील बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मात्र तो त्याच्या या सेलिब्रेशनसाठी ओळखला जात असल्याने साजिदला पाहून अनेकांना त्याची आठवण येते. पण साजिदने आपण प्रथम श्रेणी क्रिकेटपासून असं सेलिब्रेशन करतोय असं सांगितलं. मात्र याच सेलिब्रेशनसाठी आतापर्यंत दोनदा दंड झाल्याचंही साजिद म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीआधी पत्रकार परिषदेत बोलताना साजिदने, “आनंद साजरा करण्याची प्रत्येकाची स्वत:ची खास पद्धत असते. लोक म्हणतात की मी धवनची स्टाइल कॉपी करतो. मात्र मी अशापद्धतीने अगदी शालेय स्तरावरील क्रिकेटपासून आनंद साजरा करत आलोय. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या सेलिब्रेशनसाठी मला दोनदा दंड ठोठावण्यात आलाय. आता मात्र अनेकजण या सेलिब्रेशनचं कौतुक करताना दिसतंय,” असं म्हटलं.